नुकसानग्रस्त शेतकरी प्रतीक्षेत : फसल विमा योजना केवळ नावापुरतीच आहे का?
बेळगाव : शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना विम्याची भरपाई देण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे फसल विमा योजना केवळ नावापुरतीच आहे का? असा प्रश्नही शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. दुष्काळ, गारपीठ, नैसर्गिक संकटे, किडीचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी आदींमुळे शेती पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना आधार ठरते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फसल विमा योजनेचे हप्ते भरले आहेत. मात्र या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विलंब झाला आहे. तातडीने नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून भरपाई द्यावी, अशी मागणीही होत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका
शेतकऱ्यांना संकट काळात आधार मिळावा यासाठी 2016 पासून प्रधानमंत्री फसल विमा योजना लागू केली आहे. या अंतर्गत विविध पिकांसाठी शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरली आहे. दरम्यान खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर रब्बी हंगामातही किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीकडे शासन आणि कृषी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. फसल विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
विमा योजनेंर्तगत भरपाई देण्यास टाळाटाळ
अलीकडे फसल विमा योजना करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र विम्याची रक्कम बाधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम वेळेत भरली आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा योजनेंर्तगत भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्ता वेळेत भरला गेला आहे. मात्र नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे सर्वेक्षण आणि विम्याची भरपाई देण्यास विलंब होऊ लागला आहे, अशी तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे.









