लाभार्थ्यांची गैरसोय : खात्याचे दुर्लक्ष
बेळगाव : मागील काही महिन्यांपासून रेशन वितरणाची प्रक्रिया विस्कळीत होऊ लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातदेखील रेशन वितरणास विलंब झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. दरमहा 4 ते 5 तारखेदरम्यान रेशन वितरण होणे आवश्यक आहे. मात्र, 13 फेब्रुवारी उजाडला तरी लाभार्थ्यांच्या पदरात रेशन नाही, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे गोरगरिबांना धान्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना दरमहा माणसी 5 किलो धान्याचा मोफत पुरवठा केला जातो. मात्र, मागील काही महिन्यांपासून सर्व्हर आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे रेशन वितरणात अडचणी येऊ लागल्या आहेत.
त्यामुळे वितरण लांबणीवर पडू लागले आहे. डिसेंबर दरम्यान दोन महिन्यांचे रेशन दोन-चार दिवसांच्या फरकामध्येच देण्यात आले होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील रेशनही मार्च महिन्यात मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गोरगरीब लाभार्थी रेशनसाठी रेशनदुकानाच्या पायऱ्या झिजवत आहेत. दरम्यान, दुकानदारांनाही वरून रेशनचा साठाच आला नसल्याने नाईलाजास्तव लाभार्थ्यांना माघारी परतावे लागत आहे. बीपीएल, एपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांची संख्या मोठी आहे. यामध्ये सद्यस्थितीत बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना धान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, एपीएल कार्डधारकांचा रेशनपुरवठा ठप्प झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यातील रेशन वितरण लांबणीवर पडले आहे. त्यामुळे रेशन कधी मिळणार? या विवंचनेत लाभार्थी अडकले आहेत.









