लाभार्थी प्रतीक्षेत, डीबीटी समस्या : काही लाभार्थी जुलैच्या रकमेपासून वंचित : तातडीने समस्येचे निवारण करण्याची मागणी
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात देण्यात येणारी रक्कम जमा होण्यास विलंब होऊ लागली आहे. त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहेत. काही लाभार्थ्यांची जुलै महिन्याची रक्कमदेखील अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे लाभार्थी नाराज झाले आहेत. याबाबत बँक आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. डीबीटीच्या समस्येमुळे रक्कम जमा होण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजना दिल्या होत्या. त्यापैकी शक्ती, गृहज्योती, अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत पाच किलो धान्याबरोबर प्रती व्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. ही रक्कम थेट डीबीटीद्वारे कुटुंबप्रमुखाच्या नावावर जमा केली जात आहे. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांना जुलै महिन्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे नेमके घोडे अडले कुठे हेच कळेनासे झाले आहे. याबाबत बँकेत आणि अधिकाऱ्यांशी चौकशी केली असता. केवळ डीबीटीचे कारण पुढे केले जात आहे. मात्र बँकेत डीबीटी सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कोणाला विचारावे? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. डीबीटी प्रणालीतील काही अडचणींमुळे रक्कम बँक खात्यात वर्ग होण्यास विलंब होत आहे. दर महिन्याच्या 10 ते 11 तारखेपासून रेशन वितरीत केले जाते. त्याचबरोबर अन्नभाग्यची रक्कम देखील येणे आवश्यक आहे. मात्र रक्कम वर्ग होण्यास उशीर होऊ लागला आहे. त्यामुळे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. दर महिन्याच्या रेशनबरोबरच रक्कम देखील खात्यात जमा करा, अशी मागणी लाभार्थ्यांतून होऊ लागली आहे.









