पिंपरी / प्रतिनिधी :
संत तुकाराम महाराज बीज सोहळय़ासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी देहू नगरपंचायत प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य, स्वच्छता आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देहू नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली. बीज सोहळय़ाला सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, स्वच्छ आणि सुंदर देहूचा अनुभव यावा, यासाठी विशेष काळजी घेतली आहे. स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्ती केलेली आहे. नव्याने बांधलेली अत्याधुनिक शौचालये भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जागोजागी कचरा गोळा करण्यासाठी दहा ट्रॉलींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य देऊळवाडा परिसर, वैकुंठस्थान परिसर, माळवाडी, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात स्वच्छतेला प्राधान्य दिले गेले आहे.
हॉटेल व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीत चेंगराचेंगरी होवू नये यासाठी फूटपाथवरील टपऱ्या हटविण्यात येणार आहेत. बीज वारीला जवळपास दोन लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित धरून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार विभागनिहाय विविध खात्याच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले न्यायाधीश








