भारतानं संरक्षण दलांना शक्य असेल तितक्या आधुनिकतेच्या साहाय्यानं भरीव प्रमाणात बळकट करण्याचा संकल्प सोडलाय…याला चालना मिळालीय ती अवतीभवती चालू असलेल्या युद्धांतून नि ‘ऑपरेशन सिंदूर’मुळंही…त्यादृष्टीनं घातक ‘ब्राह्मोस’, ‘अस्त्र’च्या नवीन आवृत्यांसह नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्याच्या दिशेनं आपली झपाट्यानं पावलं पडू लागलीत… याच्या जेडीला विविध अत्याधुनिक साधनं उपलब्ध करण्यावर भर देण्याबरोबर विचार चाललाय तो पाकिस्तानला पुरतं नामोहरम करणाऱ्या आणखी ‘एस-400 सिस्टम्स’ खरेदी करण्याचा…
भारतीय भूदल प्रचंड आधुनिक बनण्याच्या दिशेनं धावतंय…लष्करात आधुनिक ‘स्नायपर रायफल्स’, ‘मशिनगन्स’, ‘कार्बाईन्स’, ‘रॉकेट लाँचर्स’, रणगाडे उद्ध्वस्त करून टाकणारी क्षेपणास्त्रं यांचा समावेश करण्यात आलाय तो त्या दृष्टीनंच… खेरीज नवीन ‘भैरव लाईट कमांडो युनिट’ व ‘अश्नी ड्रोन प्लाटून्स’ यांच्याही निर्मितीची प्रक्रिया नेटानं चाललीय… आपल्या भूदलात एकूण 382 ‘इन्फेंट्री बटालियन्स’ असून लष्कर सज्ज होतंय ते उच्च तंत्रज्ञानावर आधारलेल्या भविष्यातील युद्धाचं आव्हान स्वीकारण्यासाठी…
त्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून तंत्रज्ञानातील बदल हा त्याचाच एक भाग… सारं लक्ष केंद्रीत करण्यात आलंय ते घातकता, रणभूमीवरील पारदर्शकता, मोबिलिटी, प्रशिक्षण, शत्रूंपासून संरक्षण नि फेररचना यांच्यावर. ही माहिती दिलीय इन्फेंट्रीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार यांनी…सध्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारलेली लढाऊ विमानं, पाणबुड्या, हॉवित्झर्स यांचा विस्तार करण्याच्या भरात विसरण्यात येतंय ते सर्वसामान्य सैनिकांना. भारताच्या लष्करात समावेश आहे तो तब्बल 11.5 लाख सैनिकांचा. त्यांचं महत्त्व रशिया नि युक्रेन तसंच इस्रायल व हमास यांच्यातील युद्धांनी स्पष्ट केलंय. त्यादृष्टीनं जबरदस्त प्रयत्न चाललेत नि भारत खरेदी करणार ती बुलेटप्रूफ जॅकेट्स, बॅलिस्टिक हेल्मेट्स, कुठल्याही प्रदेशावर आक्रमण करण्याची क्षमता असलेली वाहनं, अचूक मारा करणारी ‘ड्रोन्स’ अन् रडार्स…
‘ब्राह्मोस’चं येतंय नवीन रूप…
दरम्यान, भारतानं सध्या लक्ष केंद्रीत केलंय ते घातक ‘ब्राह्मोस’ची क्षमता वाढविण्यावर…नव्या ‘ब्राह्मोस’मध्ये शक्ती असेल ती 800 किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्याला उद्ध्वस्त करण्याची. त्याचं दर्शन घडेल ते येऊ घातलेल्या दोन वर्षांत. खेरीज 2026-27 आर्थिक वर्षात निर्मितीला प्रारंभ होईल तो 200 किलोमीटर्सचं अंतर पार करणाऱ्या नि हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता बाळगणाऱ्या ‘अस्त्र’च्या…800 किलोमीटर्सचं अंतर ओलांडण्याची ताकद असलेल्या ‘ब्राह्मोस’च्या चाचण्या सध्या चालू आहेत…ते ‘मॉडीफाईड रेमजेट इंजिन’च्या साहाय्यानं ही शक्ती मिळविणार. लष्करातील तज्ञांच्या मते, भारताला हे नवीन क्षेपणास्त्र प्राप्त होणार ते 2027 वर्ष संपेपर्यंत…
सध्या पारंपरिक (आण्विक वॉरहेडचा वापर न करणारं) ‘ब्राह्मोस’ 450 किलोमीटर्सपर्यंत झेपावतंय आणि त्याची गती मॅक 2.8 म्हणजेच ध्वनीहून तिप्पट. ‘सुखोई-30 एमकेआय’ लढाऊ विमानांच्या साहाय्यानं ते लक्ष्याच्या दिशेनं रवाना होतं. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतानं पाकिस्तानच्या भूमीवर अक्षरश: जबरदस्त हल्ला केला होता तो त्याच्या मदतीनंच…नव्या ‘ब्राह्मोस’ला सामावून घेण्यापूर्वी गरज आहे ती आणखी काही चाचण्यांची. तेव्हा लक्ष केंद्रीत करण्यात येईल ते 100 टक्के अचूकता, भरीव प्रतिकारशक्ती आणि ‘जॅमिंग’वर मात करण्याच्या वैशिष्ट्यांवर…
त्यानंतर वेळ असेल ती नौदलाची. सध्या युद्धनौकांवर 450 किलोमीटर्स अंतर पार करणारं ‘ब्राह्मोस’ बसविण्यात आलंय अन् त्याचं स्थान घेणार ती 800 किलोमीटर्सची नवीन आवृत्ती…नौदल व भूदल यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ब्राह्मोस’ची मूलभूत यंत्रणा नि लाँचर हे पूर्वीप्रमाणंच असेल. हवाई दलासाठी निर्मिती करण्यात येत असलेल्या क्षेपणास्त्राला मात्र जादा वेळ लागण्याची शक्यता आहे…
भारत व रशियानं संयुक्तपणे साकारलेल्या आणि ‘ब्राह्मोस एअरोस्पेस’ निर्मित क्षेपणास्त्रानं गेल्या काही वर्षांत व्यवहार केलाय तो 58 हजार कोटी रुपयांचा. हे क्षेपणास्त्र भूदल, नौदल व हवाई दलाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात संरक्षण मंत्रालयानं 220 ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रं नौदलाला देण्यासाठी खरेदी केली होती ती 19 हजार 519 कोटी रुपयांच्या साहाय्यानं. तो अजूनपर्यंतचा ‘ब्राह्मोस’साठेचा सर्वांत मोठा व्यवहार. अजूनपर्यंत 20 युद्धनौकांवर ते बसविण्यात आलंय अन् त्यात समावेश विनाशिका नि फ्रिगेट्सचा…केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ‘डिफेन्स अॅक्विझिशन्स कौन्सिल’नं हिरवा झेंडा दाखविलाय तो हवाई दलाला आणखी 110 ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास अन् त्यांची किंमत 10 हजार 800 कोटी रुपये…जमिनीवरून मारा करणाऱ्या 800 किलोमीटर्सच्या ‘ब्राह्मोस’चा समावेश असेल तो ‘इंटिग्रेटेड रॉकेट फोर्स’मध्ये. त्याला साथ मिळेल ती 400 किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘प्रलय’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आणि 1 हजार किलोमीटर्सपर्यंत जाण्याची ताकद बाळगणाऱ्या ‘निर्भय’ क्षेपणास्त्राची…
नवीन ‘अस्त्र’वरही झपाट्यानं काम…
जोडीला ‘डीआरडीओ’चं अत्यंत वेगानं काम चाललंय ते ‘बियाँड व्हिज्युअल रेंज’ ‘अस्त्र-मार्क 2’ क्षेपणास्त्रांवर. सध्या त्याची क्षमता 160 किलोमीटर्सपर्यंत झेपावण्याची असून नवीन ‘अस्त्र’ लक्ष्य उद्ध्वस्त करेल ते 200 किलोमीटर्स अंतरावरील…हवाई दलानं निर्णय घेतलाय तो 280 ‘अस्त्र मार्क-1’ क्षेपणास्त्रांचा समावेश करण्याचा आणि त्यांची मारा करण्याची ताकद 100 किलोमीटर्सची…जर सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या, तर ‘अस्त्र-मार्क 2’च्या निर्मितीला प्रारंभ होईल तो सहा महिन्यांत. भारतीय हवाई दलानं 700 ‘अस्त्र-मार्क 2’ क्षेपणास्त्रं विकत घेण्याचा निर्णय घेतलाय अन् ‘सुखोई-30 एमकेआय’ व ‘तेजस’ या लढाऊ विमानांच्या आधारे शत्रूंच्या लक्ष्याला उद्धवस्त करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येईल…
येऊ घातलेल्या तीन वर्षांत 350 किलोमीटर्सपर्यंत झेपावणारं ‘अस्त्र’ निर्माण करण्याचे प्रयत्न चाललेत. या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्या म्हणजे कुठल्याही हवामानात आणि दिवसा वा रात्री त्याच्यात शत्रूचे तीन तेरा वाजविण्याची ताकद लपलीय. रशिया, फ्रान्स आणि इस्रायलची ‘बियाँड व्हिज्युअल रेंज’ हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं अतिशय महाग असल्यानं नवी दिल्लीनं ठरविलंय ते हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी स्वत:च्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची निर्मिती करण्याचं…
7 मे या दिवशी भारतानं जेव्हा उग्रवादी लपून बसलेल्या पाकिस्तानातील नऊ तळांवर हल्ला केला तेव्हा इस्लामाबादनं प्रत्युत्तर दिलं ते चीननिर्मित ‘जे-10’ व ‘पीएल-15’ या ‘बियाँड व्हिज्युअल रेंज’ क्षेपणास्त्रांच्या साहाय्यानं. 200 किलोमीटर्सचं अंतर पार करणाऱ्या त्या क्षेपणास्त्रांनी सुरुवातीला भारतीय हवाई दलावर चकीत होण्याचीच पाळी आणली…
आधुनिकीकरणासाठी पावलं…
दुसरीकडे, संरक्षण मंत्रालयानं सैन्याला आधुनिक बनविण्यासाठी अनेक पावलं उचललीत आणि त्यात समावेश ‘ड्रोन्स’, रशियाची ‘एस-400 एअर डिफेन्स’ क्षेपणास्त्रं अन् देशात बनविलेली ‘नाग’ अँटी-टँक मिसाईल सिस्टम्स यांचा. त्यांची एकूण किंमत 79 हजार कोटी रुपये वा 9 अब्ज डॉलर्स… ‘डिफेन्स अॅक्विझिशन्स कौन्सिल’नं चार मोठ्या लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स’ची (एलपीडी) 33 हजार कोटी रुपयांच्या साहाय्यानं निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यातील प्रत्येकी ‘एलपीडी’ असेल तो 20 हजार टनांचा. बोली लावण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर कुठलं शिपयार्ड त्यांची निर्मिती करणार ते ठरविण्यात येईल. ‘लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स’ नौदल, लष्कर व हवाई दल यांना मोहिमांच्या वेळी फार मोठी मदत करू शकतील…
भारतानं एकूण पाच ‘एस-400 स्क्वॉड्रन्स’ची 40 हजार कोटी रुपयांच्या साहाय्यानं खरेदी केली होती अन् त्यापैकी तीन आम्हाला मिळालीत. रशिया-युक्रेन युद्धामुळं त्यांचा पुरवठा करण्यास उशीर झालेला असून अन्य दोन हवाई दलाला लवकरच देण्यात येतील. ‘एस-400 ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टम्स’साठी 10 हजार कोटी रुपये खर्चून भारत खरेदी करणार ती 250 जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची. त्यात समावेश असेल तो 120, 200, 250 नि 380 किलोमीटर्सपर्यंत झेपावणाऱ्या क्षेपणास्त्रांचा. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी ‘एस-400’ प्रणाली अक्षरश: ‘गेमचेंजर’ ठरली…हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, ‘एस-400 सिस्टम्स’नी पाकिस्तानच्या ‘एफ-16’ व ‘जेएफ-17’ गटांतील पाच लढाऊ विमानांचा खात्मा केला. याशिवाय ‘एअर बॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल’ विमान पाडण्यात आलं ते 314 किलोमीटर्स अंतरावरून. अजूनपर्यंतचा हा भारतीय उच्चांक… या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन जेव्हा डिसेंबर महिन्यात भारतीय दौऱ्यावर येणार तेव्हा विचार चाललाय तो आणखी तीन ‘एस-400 स्क्वॉड्रन्स’ विकत घेण्याचा !
भारत विकसित करतोय नवीन भेदक शस्त्र…
? एका वृत्तानुसार, भारत विकसित करतोय ते एक जबरदस्त हायपरसॉनिक क्षेपणास्त्र…
? त्यात ताकद असेल ती पारंपरिक वॉरहेडच्या साहाय्यानं बंकर उद्ध्वस्त करण्याची…
? विश्वातील अशा प्रकारचं हे पहिलंच अस्त्र…
? ंत्यानं पाकिस्तानात खळबळ माजविलीय, कारण आपल्या शत्रू राष्ट्राला वाटतंय की, भारत त्याच्या साहाय्यानं हल्ला करणार तो त्यांच्या आण्विक सुविधांवर…
? अमेरिकेनं इराणच्या आण्विक सुविधांचे ‘जीएसयू-57 ए/बी’च्या साहाय्यानं तीन तेरा वाजविल्यानंतर भारताच्या क्षेपणास्त्रासंबंधीची माहिती विश्वासमोर आली…
? पाकिस्तानच्या प्रख्यात विश्लेषक राबिया अख्तर यांच्या मतानुसार, हे अस्त्र कदाचित ‘अग्नी-5’ आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईलचं सुधारित रूप असू शकतं आणि पाकिस्तानविरुद्धच्या भविष्यातील युद्धात भारत त्याचा वापर खात्रीनं करेल…
? ‘अग्नी’ क्षेपणास्त्राची निर्मिती करणाऱ्या ‘डीआरडीओ’नं मात्र अजूनपर्यंत नवीन शस्त्रासंबंधी काहीही जाहीर केलेलं नाहीये…
? ‘अग्नी’वर आण्विक वॉरहेड बसविण्याची व्यवस्था आहे अन् त्याच्यात क्षमता आहे ती ध्वनीच्या पाचपट गतीनं झेपावण्याची…
? अमेरिकेच्या हवाई दलाच्या ‘बी-2 स्टिल्थ बाँबर्स’मध्येच ताकद आहे ती 13 हजार 600 किलो वजनाचं ‘जीबीयू-57 ए/बी’ वाहून नेण्याची. ‘बी-2’ला जगातील सर्वांत महाग लढाऊ विमान म्हणून ओळखण्यात येतंय अन् त्याची किंमत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त…
संकलन : राजू प्रभू









