वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवार, 8 डिसेंबरला रशियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या भेटीत ते रशियासोबतच्या संरक्षणविषयक करारांना मूर्त स्वरुप देणार आहेत. रशियाकडून भारताला वेळेवर शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यावर या भेटीतील सर्वात मोठा भर असेल. भारत रशियाकडून 2 उरलेल्या एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीची मागणी करत आहे. या दौऱ्यात राजनाथ सिंह 10 डिसेंबर रोजी रशियाचे पंतप्रधान आंद्रे बेलोसोव्ह यांची भेट घेणार आहेत. तसेच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या यावर्षीच्या भारत दौऱ्यावरही चर्चा होणार आहे. पुतिन तब्बल 3 वर्षांनी भारत दौऱ्यावर येणार आहेत.
रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातक देश आहे. भारत अनेक दशकांपासून रशियाकडून क्षेपणास्त्रs, लढाऊ विमाने आणि रायफल खरेदी करत आहे. रशियाने भारताला अनेक प्रसंगी तात्काळ मदत केली असून रशियन शस्त्रास्त्रांच्या मदतीने भारताला आपली शस्त्रसंपदा भक्कम करणे सोपे झाले आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून परिस्थिती बदलत असतानाच संरक्षणमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असणार आहे.









