एससीओच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक : पाकिस्तानचे ख्वाजा आसिफही सामील होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एससीओच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत सामील होणार आहेत. अलिकडच्या काळात भारत आणि चीनदरम्यान संबंध सुधारण्याचे प्रयत्न जरी आहेत. परंतु प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. अशास्थितीत राजनाथ सिंहांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या बैठकीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफही सामील होतील.
राजनाथ सिंह 24-25 जून रोजी एससीओच्या बैठकीत भाग घेतील. यादरम्यान चीनचे संरक्षणमंत्री अॅडमिरल डोंग जूनसोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री म्हणून राजनाथ सिंह यांचा हा पहिला चीन दौरा असेल. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ देखील एससीओच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक भारत आणि पाकिस्तानदरम्यान 7-10 मेदरम्यान झालेल्या सैन्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
भारतासाठी दौरा महत्त्वपूर्ण
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश 2017 मध्ये एससीओचे पूर्णवेळ सदस्य झाले होते. या संघटनेत रशिया, चीन, कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझ्बेकिस्तान, इराण आणि बेलारुस सामील आहेत. चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्याप तणाव कमी झालेला नाही. पूर्व लडाखमध्ये देपसांग आणि डेमचोकमध्ये मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांचे सैनिक मागे हटल्यावरही स्थिती सामान्य नाही.
ड्रॅगनची पाकिस्तानला साथ
चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्वत:ची सैन्यस्थिती आणि मूलभूत सुविधा सातत्याने मजबूत करत आहे. चीनचे सैनिक तेथे अवजड शस्त्रसामग्रीसह मोठ्या संख्येत तैनात आहेत. तर पाकिस्तान आणि चीनदरम्यान सैन्यस्तरावरील सहकार्य ऑपरेशन सिंदूरदरम्यान स्पष्टपणे दिसून आले. पाकिस्तानने भारतासोबतच्या संघर्षात अनेक चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. यात जे-10 लढाऊ विमानांपासून पीएल-15 क्षेपणास्त्रs आणि एचक्यू-9 एअर डिफेन्स मिसाइल बॅटरी सामील होती.









