वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शनिवारी दोन दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर रवाना होत असून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरेल, असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे. राजनाथ सिंग आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांच्याशी चर्चा करतील. विक्रमसिंघे यांच्याकडे श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाचाही कार्यभार आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. सिंग मध्य श्रीलंकेतील नुवारा एलिया आणि देशाच्या पूर्व भागातील त्रिंकोमालीलाही भेट देतील.
गेल्यावषी ऑगस्टमध्ये भारताने श्रीलंकेला डॉर्नियर सागरी देखरेख करणारे विमान सुपूर्द केले होते. हे विमान भारतीय नौदलाकडून श्रीलंकेला वितरित करण्यात आले. तसेच भारताने गेल्यावषी संकटग्रस्त श्रीलंकेला अन्न आणि इंधन खरेदीसाठी कर्जासह मोठी आर्थिक मदत दिली. तसेच भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला 2.9 अब्ज डॉलर्सचे बेलआऊट पॅकेज मिळविण्यासाठी मदतीची हमी देखील दिली आहे. दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध मजबूत करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. श्रीलंकेवरील चीनच्या वाढत्या प्रभावाच्या चिंतेमध्ये भारत श्रीलंकेशी आपले एकंदर धोरणात्मक संबंध वाढवत आहे.









