सांगली :
संरक्षण क्षेत्रातील उत्पादने तयार करणारा मोठा उद्योग सांगलीला देण्याची महत्वपुर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केली. मराठवाडयातील वसमत येथे स्थापन्यात आलेल्या हळदीवरील संशोधन प्रकियेचे उपकेंद्र सांगलीलाही निर्माण करण्याचे व कवलापूर येथे विमानतळ स्थापन्याबाबत व्यावहारिता तपासणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड अॅग्रीकल्चर वतीने येथील न्यू प्राईड मल्टीप्लेक्स येथे पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार व यलो सिटी सांगली या परिषदेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योगव्यवसायात सांगलीसह महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे असे सांगून सामंत म्हणाले, उद्योगाच्या बाबतीत मानसिकता बदलण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणारा मी माणूस नाही. राजकारणामुळेच उद्योगामध्ये राज्य मागे पडले. मोठे उद्योग आपल्या भागात येत असताना त्या उद्योगांच्या मागे आपण ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे. सांगलीच्या एमआयडीसीतील रस्ते चांगले करण्यासाठी शासन म्हणून प्रयत्न करणार आहे. कुपवाड एमआयडीसीतील विकासकामासाठी 42 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. तर रस्ते कामासाठी 37 कोटीचा प्रस्ताव तयार आहे. यात महापालिकेचे नऊ कोटी असतील, तर नऊ कोटी रूपये उद्योजकांनी उभे करावेत. उर्वरित रक्कम शासन उपलब्ध करून देईल.
विमानतळ स्थापन्याबाबतच्या नियमावलीमध्ये बदल झाला आहे. सांगली जिल्हयामध्ये किर्लोस्कर उद्योग समुहाचे किर्लोस्करवाडीला खासगी विमानतळ आहे. नव्याने विमानतळ निर्माण करताना त्याला चांगली लांबी व रूंदी तसेच रडारची यंत्रणा याचा विचार करावा लागतो. सांगलीपासून कोल्हापूरचे अंतर जवळ आहे. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हयासाठी मागे विमानतळाची मागणी केली. त्यावेळी चिपी येथे विमानतळ झाले. पण त्या विमानतळावरून सध्या दिवसातून फक्त एकाच विमानाची ये जा होते. त्या तुलनेत गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाची मोठया प्रमाणात ये जा होते. यामुळे सांगली जिल्हयासाठी कवलापूर येथे विमानतळ उभे करताना त्याची व्यवहारिकता तपासून पाहणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
वसमत येथे हळदीवर संशोधन करणारा 100 कोटींचा मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हेमंत पाटील हे या प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत. हळदीच्या बाजारपेठेचा विचार करून सांगलीला या प्रक्रिया केंद्राचे उपपेंद स्थापन करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हसवड येथे साडेचार हजार एकरात नवीन एमआयडीसीला शासनाने मंजूरी दिली आहे. एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहण करताना यापुढे नुकसान भरपाईची रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. कोकणात प्रदूषण विरहीत उद्योग व अमरावती येथे लष्कराला कापूस पुरविणारा कापसावरील आधारीत उद्योग उभा करणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विमानतळ, ड्रायपोर्ट याबरोबरच उद्योगाना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर काम करणार आहे. यासाठी जास्तीत जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्यात येत आहे. आपणास आता पेटंट, रॉयल्टी व रिसर्च या विषयावर काम करावे लागेल. महिला स्टार्टअपमध्ये आपण क्रमांक एकवर आहोत.
कवलापूरला विमानतळ व्हायला हवे पण विमानतळाला जागा अपुरी पडते असे सांगून आमदार जयंत पाटील म्हणाले, आम्हा सगळया मंडळीनी विमानतळासाठी अनेक प्रयत्न केले. तासगाव तालुक्यासह कवठेपिरान येथील जागेचाही पर्याय पुढे आला. एमआयडीसीसाठी अलकूडच्या जागेचा आम्ही पाठपुरावा केला. शेतीवर आधारीत उद्योग येऊ शकतात. जिल्हयातील 25 ते 30 हजार लोकांच्या हाताला काम मिळेल असा उद्योग शासनाकडून मिळावा. अभियांत्रिकी महाविद्यालयाशी समन्वय ठेवून काम केल्यास उद्योगक्षेत्रामध्ये चांगले घडेल. जिल्हयासाठी नवीन एमआयडीसी मंजूर करण्याबाबत उद्योगमंत्री सामंत यांनी त्यांच्या दावोस दौऱ्यातील एक लिफाफा सांगलीसाठी उघडावा असे पाटील यांनी आवाहन केले.
नीता केळकर यांनी कवलापूर विमानतळ, ड्रायपोर्ट आदी मागण्याकडे सामंत यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी यांनी सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला छोटे उद्योग देण्याची व पलूस सांडगेवाडीतील 200 एकर जागा अधिग्रहणाची मागणी केली. उद्योगपती प्रविणशेठ लुंकड यांनी अलकुडला नवीन एमआयडीसी व सांगलीमध्ये अन्न प्रक्रियेवरील फुड टेस्टींग लायब्dरारी स्थापन्याची मागणी केली. रवींद्र माणगावे यांनी स्वागत तर प्रकाश शहा यांनी आभार मानले. परिषदेला गिरीष चितळे, विनोद पाटील, सचिन पाटील, बाळासाहेब कलशेट्टी, संजय बजाज, सुदर्शन हेरले, धमेंद्र पवार, हरिदास पाटील उपस्थित होते.








