श्रीलंकेचा आठ गडी राखून विजय : इंग्लंड संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर : समरविक्रमा, निसांकाची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था /बेंगळूर
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये गुरुवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे श्रीलंकेने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले. तर, या पराभवामुळे इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर एवढ्या कमी धावसंख्येवर संघ ऑलआऊट होण्याची ही पहिलीच वेळ होती. इंग्लंड संघाने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याशिवाय वर्ल्डकपच्या इतिहासात श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. सुरुवातीला लंकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर विद्यमान विजेत्या इंग्लंडचा डाव 33.2 षटकांत अवघ्या 156 धावांत आटोपला. यानंतर विजयासाठीचे आव्हान श्रीलंकेने 25.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. श्रीलंकेच्या या विजयात वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा आणि सलामीवीर पथुम निसांका यांचे महत्त्वाचे योगदान होते. या विजयासह लंकन संघाने चार गुणासह पाचवे स्थान पटकावले आहे तर इंग्लंडची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. दरम्यान, इंग्लंडचा पाच सामन्यातील चौथा पराभव असून या पराभवामुळे त्यांचे वर्ल्डकपमधील स्थानच धोक्यात आले आहे.
निसांका, समरविक्रमाची शानदार अर्धशतके
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कुसल परेरा 4 धावा काढून बाद झाला. त्याला डेव्हिड विलीने बाद केले. कर्णधार कुसल मेंडिसही स्वस्तात परतला. त्यालाही विलीने तंबूचा रस्ता दाखवला. मेंडिसने 2 चौकारासह 11 धावा जमवल्या. सलामीचे दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर पथून निसांका व समरविक्रमा यांनी लंकेचा डाव सावरला. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत लंकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी साकारली. निसांकाने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 83 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह नाबाद 77 धावा फटकावल्या तर समरविक्रमाने 54 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 65 धावांचे योगदान दिले. या जोडीच्या शानदार खेळीच्या जोरावर लंकेने विजयी लक्ष्य 26 व्या षटकांतच पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. इंग्लंडकडून डेविड विलीने दोन गडी बाद केले.
इंग्लंडचा 156 धावांत खुर्दा
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. सुरुवातीला सलामीवीर डेव्हिड मलान व जॉनी बेअरस्टो यांनी 45 धावांची सलामी दिली. ही जोडी जमलेली असतानाच मलानचा अडथळा अँजेलो मॅथ्यूजने दूर केला. 28 धावांवर त्याला बाद केले. यानंतर अनुभवी फलंदाज जो रुटही फार काळ टिकला नाही. अवघ्या 3 काढून तो तंबूत परतला. दुसरीकडे जॉनी बेअरस्टोकडून अपेक्षा होत्या, पण तो ही कसून रजिथाचा बळी ठरला. त्याने 3 चौकारासह 30 धावा केल्या. कर्णधार बटलर आठ धावा करून तर लिव्हिंगस्टोन एक धावा करून बाद झाला. यावेळी 16 व्या षटकांत इंग्लंडची 5 बाद 85 अशी स्थिती झाली होती.
बेन स्टोक्सच्या सर्वाधिक 43 धावा
एका बाजूने अनुभवी फलंदाज बाद होत असताना बेन स्टोक्स एका टोकाला उभा होता. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. इंग्लंडचे फलंदाज खराब शॉट खेळून विकेट्स देत राहिले. मोईन अली 15, ख्रिस वोक्स 0 आणि आदिल रशीद 2 धावा करून बाद झाले. स्टोक्सने मात्र 73 चेंडूत 6 चौकारासह 43 धावा केल्याने इंग्लंडला दीडशेचा टप्पा तरी गाठता आला. स्टोक्स बाद झाल्यानंतर मात्र गतविजेत्यांचा डाव 33.2 षटकांत 156 धावांत आटोपला. डेविड विली 14 धावांवर नाबाद राहिला. तळाचा फलंदाज मार्क वूडला पाच धावा करता आल्या. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेच्या लाहिरु कुमाराने शानदार गोलंदाजी करताना 35 धावांत 3 बळी घेतले तर कसुन रजिथा व अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय महेश थीक्षनाला एक बळी मिळाला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 33.2 षटकांत सर्वबाद 156 (जॉनी बेअरस्टो 30, डेव्हिड मलान 28, बेन स्टोक्स 43, मोईन अली 15, डेविड विली नाबाद 14, लाहिरु कुमारा तीन तर रजिथा, मॅथ्यूज दोन बळी). श्रीलंका 25.4 षटकांत 2 बाद 160 (पथून निसांका नाबाद 77, समरविक्रमा नाबाद 65, कुसल मेंडिस 11, डेविड विली 30 धावांत 2 बळी).
वर्ल्डकपमध्ये इंग्लंडवर लंकेचा सलग पाचवा विजय
श्रीलंकन संघाने सलग पाचव्या विश्वचषकात इंग्लंडला विजय मिळवू दिला नाही. 2007 मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषकात त्यांनी इंग्लंडचा पाडाव केला होता. त्यानंतर 2011 वनडे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेने इंग्लंडला मात दिली होती. त्यानंतर 2015 वनडे विश्वचषकावेळी कुमार संगकाराच्या शतकाने इंग्लंड विजयापासून वंचित राहिली होती. तर मागील विश्वचषकात श्रीलंकेने कमबॅक करत विजय संपादन केला होता. त्यानंतर आता सलग पाचव्यांदा श्रीलंका संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
या वर्ल्डकपमधील वैयक्तिक सर्वाधिक धावा
- डिकॉक (द.आफ्रिका) 5 सामने 407 धावा
- विराट कोहली (भारत) 5 सामने 354 धावा
- डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 5 सामने 332 धावा
- रोहित शर्मा (भारत) 5 सामने 311 धावा
- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) 5 सामने 302 धावा
या वर्ल्डकपमधील सर्वाधिक बळी
- अॅडम झाम्पा 5 सामने 13 बळी
- मिचेल सँटेनर (न्यूझीलंड) 5 सामने 12 बळी
- जसप्रीत बुमराह (भारत) 5 सामने 11 बळी
- मधुशनका (श्रीलंका) 4 सामने 11 बळी
- मॅट हेन्री (न्यूझीलंड) 5 सामने 10 बळी
वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावा
- दक्षिण आफ्रिका 5 बाद 428 वि श्रीलंका
- द.आफ्रिका 7 बाद 399 वि. इंग्लंड
वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठा विजय
- ऑस्ट्रेलिया 309 धावांनी विजयी वि नेदरलँड्स
- द.आफ्रिका 229 धावांनी विजयी वि इंग्लंड
वर्ल्डकपमधील वैयक्तिक सर्वोच्च धावा
- डिकॉक 174 धावा वि. बांगलादेश
- डेव्हिड वॉर्नर 163 धावा वि पाकिस्तान
वर्ल्डकपमध्ये एका डावात सर्वोच्च बळी
- मोहम्मद शमी 54 धावांत 5 बळी वि न्यूझीलंड
- मिचेल सँटेनर 59 धावांत 5 बळी वि नेदरलँड्स










