वृत्तसंस्था/ झाग्रेब (क्रोएशिया)
येथे सुरू असलेल्या झाग्रेब खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल तसेच कनिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदक विजेती 22 वर्षीय भातेरीला उपांत्य फेरीत जपानच्या माहिरो योशितेकीकडून पराभव पत्करावा लागला. आता या स्पर्धेत भातेरी कास्यपदकासाठी लढत देईल.
65 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत जपानच्या माहिरो योशितेकीने तांत्रिक गुणावर भातेरीचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भातेरी आणि क्रोएशियाची इव्हा गेरिक यांच्यात कास्यपदकासाठी लढत होईल. भातेरी आणि योशितेकी यांच्यातील उपांत्य लढतीत भातेरीने सुरुवातीला 2-1 अशा गुणाची आघाडी माहिरोवर मिळवली होती. पण त्यानंतर जपानच्या माहिरोने दर्जेदार खेळ करत भातेरीचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेत 68 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत माल्डोव्हाच्या इरिना रिनगेन्सीने भारताच्या राधिकाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात गेल्या गुरुवारी भारताच्या अमन सेरावतने 57 किलो वजन गटात कास्यपदक मिळवताना अमेरिकेच्या रिचर्डसचा 10-4 असा पराभव केला होता. या स्पर्धेसाठी भारताचे अव्वल मल्ल विनेश फोगट, बजरंग पुनिया, रवी दाहिया यांना वगळण्यात आले होते. त्याचप्रमाणे दीपक पुनिया, अनशू मलिक, संगीता फोगट, सरिता मोर, जितेंद्र किना यांनीही या स्पर्धेत सहभाग दर्शवला नाही.









