100 रुपयांच्या बाँडवरील घरे अधिकृत : जनतेने घाबरण्याचे कारण नाही
बेळगाव : दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. टिळकवाडी, अयोध्यानगर, द्वारकानगर, गोडसेवाडी या परिसरात रविवारी त्यांना पुन्हा बोलावून आशीर्वाद देण्यात आले. यावेळी घेतलेल्या सभेमध्ये माजी महापौर आणि नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. दडपशाहीला झुगाऊन मोठ्या मताधिक्क्याने रमाकांत कोंडुस्करांना विजयी करण्याचे आवाहन म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. माजी महापौर महेश नाईक यांच्या कालावधीतच स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवात झाली होती. त्यानंतर कामांना चालना देण्यात आली होती. गॅस पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची अमृत पाईप लाईन, 55 हजार स्ट्रीट लाईट लावण्याबाबत 2014 ते 2019 या कालावधीत मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वीपासूनच विकास होत आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतूनच हा विकास होत आहे. यामुळे या विकासाबाबत कोणीही एकाने श्रेय घेऊ नये, असे माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक पंढरी परब यांनी स्पष्ट केले.
अक्रम सक्रम योजना यापूर्वीच लागू
उपनगरांमध्ये 100 रुपयांच्या बाँडवर घरे उभारण्यात आली आहेत. विधानसभेमध्ये याबाबत ही सर्व घरे अक्रम सक्रम योजनेंतर्गत त्या घरांना पूर्ण परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही घरे पाडवण्याची धमकी देत असेल तर त्याला घाबरू नये. कारण सरकारनेच त्यांना परवानगी दिली आहे. तेव्हा मतदारांनी कोणत्याही धमकीला न घाबरता समितीच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन माजी नगरसेवकांनी केली आहे. अयोध्यानगर तिसरा क्रॉस येथे ही सभा झाली. प्रारंभी माजी महापौर अॅड. नागेश सातेरी यांनी रमाकांत कोंडुस्कर यांचे स्वागत केले. त्यानंतर रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, मी निवडून आलो तर संपूर्ण जनता ही आमदार राहील. सर्व विकास करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 10 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचे अनमोल मत देऊन म. ए. समितीला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. युवा म. ए. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले, बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यानंतर रमाकांत कोंडुस्कर यांनी निषेध नोंदवण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे निदर्शने केली. यावेळी त्यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी कोंडुस्कर यांनी सर्वांना धीर दिला. त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, असा हा एक नि:स्वार्थी शिवभक्त आहे. तेव्हा मतदारांनी याची दखल घेऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अॅड. संतोष कांबळे, माजी नगरसेवक अनंत देशपांडे, राजीव आचगावकर, कुसुम टपाले, राम गवळी, पप्पू किणयेकर, मोहन कांबळे, बसवंत पाटील, यांच्यासह इतर पंचमंडळी, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.









