20 वर्षाखालील वयोगटातील पात्र फेरीची फुटबॉल स्पर्धा
वृत्तसंस्था/ कुवेत सिटी
येथे सुरू असलेल्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या ह गटातील सलामीच्या सामन्यात भारताच्या युवा फुटबॉल संघाला इराककडून पराभव पत्करावा लागला. इराकने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत विजयी सलामी दिली.
या सामन्यामध्ये दोन्ही संघांकडून एकूण 6 गोल नोंदविले गेले. खेळाच्या दुसऱयाच मिनिटाला इराकचे खाते अब्दुल रझाक कासीमने उघडले. दरम्यान, भारतीय संघातील गुरुकिरात सिंग आणि तैसन यांनी इराकच्या बचावफळीवर वारंवार दडपण आणले. 22 व्या मिनिटाला गुरुकिरतने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. 33 व्या मिनिटाला गुरुकिरतने मेसनच्या पासवर भारताचा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने इराकवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती.
सामन्याच्या उत्तरार्धात इराक संघातील जहीद बुखारी, अशर अली आणि अबुद रेबाह यांनी बचावफळीत शानदार कामगिरी करत भारताची आक्रमणे थोपविली. उत्तरार्धातील खेळाच्या पाचव्या मिनिटाला भारतीय संघातील जेंग्राने हेडरद्वारे मारलेला फटका इराकच्या गोलरक्षकाने थोपविला. 51 व्या मिनिटाला हैदर तौफिकने इराकचा दुसरा गोल नोंदवून बरोबरी साधून दिली. झहीदने 62 व्या मिनिटाला अब्दुल रझाकचा फटका अडविल्याने इराकला आघाडी मिळविता आली नाही. पण, 63 व्या मिनिटाला सादिक शाहीनने भारतीय बचावफळीला हुलकावणी देत इराकचा तिसरा गोल केला. 71 व्या मिनिटाला आझाद कलोरीच्या अचूक फटक्मयावर इराकने या सामन्यातील आपला चौथा गोल नोंदविला. सामना संपण्यास पंधरा मिनिटे बाकी असताना भारतीय संघातील सुहेल भट्टचा गोल नोंदविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. 20 वर्षांखालील वयोगटातील सुरू असलेल्या एएफसी फुटबॉल चॅम्पियनशिप पात्र फेरीमध्ये आता भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी 16 ऑक्टोबरला खेळविला जाणार आहे.









