उद्धव ठाकरे यांची मुलाखतीमधून मांडली कारणे
प्रतिनिधी, / मुंबई :
लोकसभेत चांगले यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीला अंतर्गत मतभेदामुळे विधानसभेच्या निवडणुकीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशी कारणमीमांसा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ मध्ये खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत कबुली दिली आहे. निवडणूक आयोग, भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही डोक्यात हवा गेल्यानेच आमचा पराभव झाल्याचे मान्य केले आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे.
आघाडीतील मतभेदांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मतदारसंघ छोटा होतो, तशी स्पर्धा वाढते. आघाडीत दोन-तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते. युतीही होत होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्यावेळीही शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ सोडले. विधानसभेत शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. त्यामुळे जनतेला वाटले की, यांच्यात आताच खेचाखेची आहे, तर हे नंतर काय करतील, असा त्याचा दुष्परिणाम झाला.
विधानसभेला निशाणी होती पण……
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही, असे त्यानी म्हटले आहे.
आपण केलेली कामे लोकांना सांगण्यात कमी पडलो
विधानसभेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडलाच, काही अंशी सत्य असेल, पण प्रत्यक्ष मी बघायला गेलो नाही. पण हे आपल्याकडून जी उणीव राहिली ती आपण स्वीकारली पाहिजे, ती म्हणजे आपण केलेली कामे आपण लोकांना सांगण्यात कमी पडलो. आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शिवभोजन थाळी सुऊ केली, शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता, बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. कायदा -सुव्यवस्था चांगली होती, असे ते म्हणाले.
मी मुख्यमंत्री म्हणून कोरोनासारख्या संकटात यांच्यासारखे ‘कटेंगे तो बटेंगे’ असे केलं नाही. मी सगळ्यांना समानतेने वागवले. सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्यावेळेला मी स्वत: जबाबदारी घेऊन लोकांसमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गेलो. जनतेने मला कुटुंबातले एक मानले. यासारखे दुसरे समाधान नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
निवडणूक बॅलेट पेपरवर हव्या
महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. पण जल्लोष कुठे झाला नाही. अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघायला पाहिजे होता. मात्र तो अवाक् का झाला? ग्रामीण भागातील अनेक लोक म्हणतात, आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केले, तरी आमच्या गावात तुम्हाला इतकी मते कशी मिळाली माहिती नाही. पुरावेच्या पुरावे नष्ट केले जातात. ईव्हीएम हँकिंगचा मुद्दा वेगळा. पण लोकशाहीत आरटीआयमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो. तर माझी माहितीही मिळाली पाहिजे. मतपत्रिकेवर मतदान व्हायला पाहिजे. अमेरिका, युरोपमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होते. ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
डोक्यात हवा गेली होती : वडेट्टीवार
उद्धव ठाकरे यांनी आरसा दाखवल्यानंतर आघाडीतून त्याबाबत प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले, लोकसभेत इंडिया आघाडीचे व्यवस्थित काम झाले. त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की, सर्व जागा आम्हीच जिंकणार, असे तिन्ही पक्षांना वाटले. त्यामुळे दीड महिना चर्चेत घालवला. प्रचार आणि प्लॅनिंग सोडून 40 दिवस आमचे वाया गेले. 28-30 बैठका झाल्या. यामध्ये वेळ गेला. प्लॅनिंग करू शकलो नाही. नुकसान भोगावे लागले. उद्धव ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. प्रत्येकाला अधिक जागा पदरात पाडून घ्यायच्या होत्या. त्यातून प्रचंड नुकसान झाले हे खरे आहे, अशी कबुली वडेट्टीवार यांनी दिली. अनेकांच्या डोक्यात ते वारे घुसले होते. जागावाटपाचा मोठा घोळ झाला. मतदार यादीत घोळ होता, त्यात आम्हाला लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही, असे प्रांजळ मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.








