महानगरपालिका आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय : विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : महापालिकेमध्ये कामगार नियुक्तीवरून गेल्या आठवड्याभरात बरेच राजकारण तापले आहे. सत्ताधारी पक्षामधील नगरसेवकांमध्येच त्यावरून वाद निर्माण झाला होता. एका प्रसार माध्यमातून इतर भाषिकांना प्राधान्य म्हणून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत खुलासा करण्यात आला. अधिकाऱ्यांनी एका कंपनीला कंत्राट दिले असून त्यांचे ते कर्मचारी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेला तसेच नगरसेवकांना चांगलाच दणका बसला. शुक्रवारी आरोग्य स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी कामगारांच्या नियुक्तीबाबतची सर्व माहिती बैठकीत देण्याची सूचना केली. महापालिकेमध्ये महापौरांच्या उपस्थितीत ठराव झाला. त्यानंतर एका कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्यामध्ये 138 कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. मात्र महापालिकेने ती थेट नियुक्ती केली नाही, असे साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेमध्ये भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या नगरसेवकांचीही पोलखोल झाली. याबाबत एका प्रसार माध्यमावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सोशल मीडियावरून वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या त्या प्रसार माध्यमावर मानहानीचा दावा महापालिकेतर्फे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाहक बदनामी होत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.
शहरातील स्वच्छतागृहांबाबत चर्चा
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातून तसेच जिल्ह्यातून नागरिक येत असतात. मात्र स्वच्छतागृह न सल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. शहापूर परिसरात स्वच्छतागृह नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. याबाबत नगरसेवकांनी जोरदार आवाज उठविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका कंपनीला शौचालये उभारणीसाठी कंत्राट देण्यात येणार आहे. त्याबाबत सभागृहात ठराव मंजूर करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. सध्या आरपीडी क्रॉस, रविवारपेठ, नरगुंदकर भावे चौक आणि आरटीओ येथे स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. त्याबाबत एका कंपनीने तयार स्वच्छतागृहांबाबत संपूर्ण माहिती दिली असून त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
प्रत्येक प्रभागात फलक उभारण्याची मागणी
प्रत्येक प्रभागामध्ये जे अधिकारी काम करतात त्यांचे संपूर्ण नाव तसेच त्यांचा विभाग, याचबरोबर प्रभागाची माहिती असलेले फलक उभे करावेत, अशी मागणी सभागृहाचे विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी केली. यावर साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी क्युआरकोड तयार करून त्याचे फलक उभे करण्याचा निर्णय आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घेतला आहे. लवकरच तसे फलक उभे केले जातील. त्या क्युआरकोडमध्ये प्रभागाची संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधीक्षक अभियंते उपस्थित नसल्याने धरले धारेवर
स्थायी समितीच्या बैठकीला महापालिकेचे अधीक्षक अभियंते कधीच उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे आम्ही नेमके कोणाला प्रश्न विचारायचे? असा प्रश्न अध्यक्ष रवी धोत्रे यांनी उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांना केला. त्यावेळी त्या मूग गिळून गप्प राहिल्या. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी त्याविरोधात जोरदार आवाज उठविला. त्यामुळे उपायुक्तांनी इतर कामांसाठी त्यांना बाहेर जावे लागते, अशी कारणे दिली. मात्र स्थायी समितीच्या सदस्यांना संबंधित अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावा, असे सुनावले. त्यामुळे काहीवेळ गोंधळ उडाला. महापालिका आयुक्त, नगरसेवक, इतर अधिकारी व कर्मचारी पहाटे प्रभागामध्ये हजर होत आहेत. मात्र अधीक्षक अभियंते कधीच फिरकत नाहीत. बैठकीलाही कधीच उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे आम्ही समस्या कोणाकडे मांडायची, असा प्रश्न उपस्थित केला. प्रारंभी मागील बैठकीत झालेल्या ठरावांना सहमती दर्शवून बैठकीला सुऊवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील आरोग्य केंद्रांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र यावर चर्चा पूर्णपणे झाली नसल्याने पुढील बैठकीत चर्चा करून शहरातील आरोग्य केंद्रे कोणाकडे सुपूर्द करायची? हे ठरविण्यात येणार आहे. बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
प्रत्येक प्रभागात फलक उभारण्याची मागणी
प्रत्येक प्रभागामध्ये जे अधिकारी काम करतात त्यांचे संपूर्ण नाव तसेच त्यांचा विभाग, याचबरोबर प्रभागाची माहिती असलेले फलक उभे करावेत, अशी मागणी सभागृहाचे विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी केली. यावर साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी यांनी क्युआरकोड तयार करून त्याचे फलक उभे करण्याचा निर्णय आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घेतला आहे. लवकरच तसे फलक उभे केले जातील. त्या क्युआरकोडमध्ये प्रभागाची संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.









