कराड :
‘मॅन काईंड जस्टिस’ या व्हॉट्सअप ग्रुपवरून अज्ञात क्रमांकावरून बनावट अश्लील व्हिडीओ प्रसारित करून कराड येथील महिला डॉक्टर आणि साक्षीदारांची बदनामी केल्याप्रकरणी कराडच्या शिंदे मळ्यातील कथित डॉक्टर राजेश शिंदे व पंजाबच्या एकाची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अज्ञात क्रमांकावरून फिर्यादी महिला डॉक्टर व साक्षीदारांचे फोटो प्राप्त करून, त्याचा वापर अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी करण्यात आला. या व्हिडीओत वापरलेला आवाज आणि त्यातील अश्लील शब्दांमुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याचप्रमाणे, इम्रान मुल्ला या इसमाचा एडिट केलेला फोटोदेखील या व्हिडीओत वापरण्यात आला होता.
हा व्हिडीओ आणि मजकूर हे अश्लील स्वरूपाचे असल्याचे माहिती असूनही तो जाणीवपूर्वक व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित करण्यात आला होता. या प्रकाराबाबत माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल क्रमांकाच्या तपासाद्वारे या प्रकरणातील प्रमुख आरोपी शोधण्यात आले. यात पंजाब राज्यातील मोहाली येथील विकास विद्याभूषण शर्मा (वय 55, रा. सेक्टर नं. 78, रूम नं. 22, सुहाना, मोहाली) याचा सहभाग निष्पन्न झाला. त्याच्या अटकेसाठी कराड शहर पोलिसांचे विशेष पथक पंजाबला रवाना करण्यात आले होते. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात दुसरा व मुख्य आरोपी राजेश मारुती शिंदे (वय 56, व्यवसाय हॉस्पिटल मॅनेजमेंट, रा. 124/1, बाराडबरी रोड, शिंदे मळा, कराड, जि. सातारा) असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या दोघांनी मिळून सूडबुद्धीने महिला डॉक्टर व साक्षीदारांविरोधात बनावट अश्लील व्हिडीओ तयार केल्याची कबुली तपास पथकासमोर दिली आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून वापरलेले मोबाईल फोन्स आणि लॅपटॉप्स जप्त करण्यात आले आहेत.
सदर कारवाई कराडचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, उपनिरीक्षक मगदूम आणि इतर कर्मचाऱ्यांनी सखोल तपास करत या गुह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.








