द्रमुक फाइल्सवरून उचलले पाऊल
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री अन् द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे. अण्णामलाई यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या ‘डीएमके फाइल्स’ आणि यासंबंधी त्यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेसंबंधी स्टॅलिन यांनी हे पाऊल उचलले आहे.
तामिळनाडू भाजप अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी द्रमुकवर निशाणा साधत कथित ‘खुलासा’ करणारा एक व्हिडिओ जारी केला होता. 12 द्रमुक सदस्यांकडे कथित स्वरुपात 1.34 लाख कोटी रुपयांची संपत्ती असून यात मुख्यमंत्री स्टॅलिन, त्यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी, जावई व्ही. सबरीसन आणि बहिण एम. कनिमोझ यांचा समावेश असल्याचे अण्णामलाई यांनी म्हटले होते.
अण्णामलाई यांनी केलेले आरोप हे खोटे अन् अपमानास्पद आहेत असे म्हणत द्रमुकने हा व्हिडिओ सार्वजनिक डोमेनमधून हटविण्याची मागणी केली होती.









