भारताच्या शेजारील देश पाकिस्तानात एक परंपरा कायम आहे. या देशात गेल्या पंचाहत्तर वर्षात एकही पंतप्रधान आपल्या निवडीची पाच वर्षांची मुदत पूर्ण करू शकलेला नाही. पंतप्रधानपद हे पाकिस्तानात खऱया अर्थाने काटेरी सिंहासन आहे. त्यावर बसणारी क्यक्ती कधी राजकीय कट, कधी लष्करी कारस्थान तर कधी न्यायालयीन कारवाईमुळे पदच्युत होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने आपल्या पंतप्रधानपदाची कमी-अधिक कारकीर्द संपविली आहे आणि ती पुढे शांततापूर्ण जीवन जगत आहे, असेही या देशात घडलेले नाही.
पंतप्रधानांना या देशात फाशी दिली जाते, त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांना तुरुंगात धाडले जाते. त्यामुळे पंतप्रधानपद स्वीकारणे हीच मुळी या देशात सुळावरची पोळी मानली जाते. आरंभीचे पंतप्रधान लियाकत अलीपासून परवाचे पंतप्रधान इम्रान खानपर्यंत सारी उदाहरणे जर पाहिली तर पाकिस्तानी लोकशाहीचे विकृत दर्शन त्यातून घडून येते. पाकिस्तानाचे संस्थापक मंहमद अली जीनाना पाकिस्तान हा देश युरोपियन लोकशाही देशांप्रमाणे बनवायचा होता. अर्थात, ही त्यांची सदिच्छा प्रत्यक्षात त्यांच्या कृतीशी विसंगत होती. भारताशी फारकत घेऊन नवा देश निर्मिण्यासाठी स्वतः जीनानी धर्माचा आधार घेतला होता. एकदा तो तसा घेऊन देशनिर्मिती झाल्यानंतर धर्मास राज्यक्यवस्थेत स्थान न देणारी युरोपियन पद्धतीच्या लोकशाहीची अपेक्षा हा जीनाच्या विचारातील मोठाच विरोधाभास होता आणि अपरिहार्यपणे त्यांची अपेक्षा पाकमध्ये सातत्याने धुळीस मिळत गेली.
पाकिस्तानात ऑगस्ट 2018 मध्ये पंतप्रधानपदी आलेले आणि एप्रिल 2022 रोजी अविश्वास ठरावाद्वारे ते पद गमावलेले तेहरिके इन्साफ पक्षाचे इम्रान खान यांनादेखील जीनाप्रमाणेच पाकिस्तानात युरोपियन पद्धतीची लोकशाही आणायची होती. त्यांचे शिक्षण ब्रिटनला झाले होते. क्रिकेटपटू म्हणून त्यांची जडणघडण पाश्चात्य वातावरणात झाली होती. त्यामुळे तेथील समाज-राजकीय वातावरण आणि मायदेश पाकिस्तानातील वातावरण यातील भेद त्यांना जाणवत होता. युरोपियन लोकशाहीत संपूर्ण प्रजाप्रभुत्व हे राज्यव्यवस्थेचे प्रमुख अंग असते. यातून संस्थापित झालेले लोकशाही सरकार आणि देशाचे लष्कर यातील समतोल आणि नियमन याच्या दिशा तेथे स्पष्ट असतात. निवडून आलेल्या सरकारवर देशाची जबाबदारी आणि लष्कराच्या हाती अप्रत्यक्ष सत्ता अशी विसंगत स्थिती तेथे नसते. पाकिस्तानात मात्र ही स्थिती कायम आहे, हे इम्रान खान यांना माहित होते. हे चित्र त्यांना बदलायचे होते. परंतु, राजकीय संधीसाधूपणा म्हणा, मजबुरी किंवा परिस्थितीजन्य अपरिहार्यता म्हणा 2018 साली सत्तेवर येण्यास पाकिस्तानी लष्करानेच इम्रान खान यांचा मार्ग निष्कंटक केला. इम्रानच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत प्रारंभीची तीन वर्षे इम्रान आणि लष्करप्रमुख बाजवा यांचे संबंध मधुर होते. मग वाजले कुठे? तर इम्रान यांच्याच म्हणण्याप्रमाणे पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ गट) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी या दोन प्रबळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नॅशनल अकाऊंटीबिलिटी ब्युरो या संस्थेने जे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आरोप व तत्संबंधी खटले पुढे चालवून ही प्रकरणे धसास लावण्याचा आपला प्रयत्न होता. परंतु, ही संस्था ज्यांच्या नियंत्रणात होती त्या लष्करप्रमुख बाजवा यांनी भ्रष्टाचार प्रकरण पुढे चालवण्यात स्वारस्य दाखविले नाही. याऐवजी आपले सरकार पाडविण्यासाठी लष्करप्रमुख सक्रिय झाले, असा आक्षेप इम्रान खान यांनी नोंदवला आहे.
तथापि, इम्रान खान आज कितीही संभावितपणाचा आव आणत असले तरी त्यांच्याही अल्प कारकीर्दीत पारदर्शकतेचा अभाव, भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंग यासंदर्भात जागतिक भ्रष्टाचारविरोधी आलेखात पाकिस्तान अगदी खालच्या क्रमांकावर घसरला होता. पंतप्रधानपद गमावलेल्या इम्रान खानच्या मागे आता पाकिस्तानी राज्य परंपरेप्रमाणे पोलीस, चौकशी यंत्रणा आणि न्यायालयाचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावरील अनेक प्रकरणांपैकी एक प्रकरण म्हणजे सत्तेवर असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा गैरव्यवहार. पाकिस्तानी कायद्याप्रमाणे राजकीय पदाधिकाऱयांनी त्यांना मिळालेल्या साऱया भेटवस्तू या जाहीर करावयाच्या असतात.
यानंतर एका विशिष्ट किमतीखालील भेटवस्तू आपल्याकडेच राखण्याची त्यांना मुभाही दिली जाते. आपल्या कार्यकाळात इम्रान खानने ज्या भेटवस्तू स्वीकारल्या त्या त्यांनी जाहीर केल्या नाहीत. काही भेटवस्तू त्यांनी विकून टाकल्या आहेत आणि हा कायदेभंग आहे. या अनुषंगाने इम्रान खानवर अलीकडेच खटला भरून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, या ना त्या कारणाने इम्रान खानने न्यायालयात जाणे टाळले. अशावेळी इस्लामाबाद पोलिसांचे एक पथक खान यांच्या निवासस्थानी त्यांना अटक करण्यासाठी गेले. मात्र, घराबाहेरील पक्ष कार्यकर्त्यांचा आणि पोलिसांचा संघर्ष झाला. अंतिमतः इम्रान खान घरात नसल्याचे चित्र पुढे आले. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान खान पोलीस आले तेव्हा निवासस्थानी होते. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून कंपाऊंड भिंतीवरून उडी मारून त्यांनी शेजारील घराचा आसरा घेतला. पोलीस ते निवासस्थानी नसल्याचे पाहून निघून जाताच ते पुन्हा निवासस्थानी अवतरले आणि उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांपुढे लंबेचौडे भाषण देत ‘जेल भरो’चा आदेश दिला.
दरम्यान, पाकिस्तानी माध्यम नियंत्रण मंडळाने तेथील दूरदर्शन वाहिन्यांना इम्रान खान यांची भाषणे, पत्रकार परिषदा, मुलाखती प्रसारित करू नयेत, असे सक्त आदेश देताना, माजी पंतप्रधान राजकीय संस्थांवर टीका करून त्यांना बदनाम करीत आहेत आणि देशात द्वेषाचे वातावरण पसरवत आहेत, असा ठपका ठेवला आहे. एकंदरीत पाकचे हंगामी पंतप्रधान शहबाज शरिफ यांचे सरकार देशाची रसातळास जाणारी अर्थव्यवस्था, दहशतवादी हल्ले, विरोधकांची षड्यंत्रे, लष्करी दादागिरी आणि न्यायालयाची मनमानी यामुळे पूर्णतः जेरीस आले आहे. तेथील लोकशाहीची प्रकृती अत्यंत दुर्बळ व चिंताजनक बनली आहे. इम्रान खान आणि तेथील तथाकथित लोकशाहीचे भविष्य आता काळाच्याच हाती आहे.
– अनिल आजगावकर








