मंडणगड, प्रतिनिधी
Mandangad Crime News : खासगी गाडीतून हरणाची शिंगे घेवून जाणाऱ्या व्यक्तीचा थरारक पाठलाग करत दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी शिंगेही हस्तगत करण्याची यशस्वी कामगिरी मंडणगड व बाणकोट सागरी पोलीस स्थानकाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाणकोट पोलिसांना गस्त घालीत असताना वन्यजीव प्राण्यांच्या अवयवाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने बाणकोट पोलिसांनी देव्हारे येथे तत्काळ नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी सुरु केली.दरम्यान, संशयीत वाहन येताना दिसले असता पोलिसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र वाहनकाचालकाने पोलिसांना हुलकावणी देत नाकांबदीतून पळ काढला.यावर पोलिसांनी त्या वाहनाचा तत्काळ पाठलाग सुरु केला. काही अंतर पुढे गेल्यावर गाडी चालकाने एका वळणावर सफेद रंगाची प्लास्टीक पिशवी गाडीवर फेकल्याचे पोलिसांना दिसून आले.
ती संशयीत गाडी सुसाट वेगाने मंडणगडच्या दिशेने धावत होती.सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य यांनी याबाबत फोनद्वारे मंडणगड पोलीस ठाण्यास या घटनेची माहिती पुरवली.त्यानंतर येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी पालवणी चेकपोस्ट येथे ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांनासुध्दा या गाडीने हुलकावणी देवून गाडी मंडणगड बाजारपेठेच्या दिशेने सुसाट वेगाने निघून गेली.
याची माहिती पोलीस निरीक्षक शैलजा सावंत यांना मिळताच त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर नाकाबंदी करुन संशयीत वाहन थांबवले व त्यातील राहूल दिलीप भोसले (24, राहणार नवानगर पिंपळवाडी तिसंगी, तालुका खेड) व विनिता फिलीफ केसकर (53, राहणार एकवीरा नगर पुंभारवाडा खेड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर गाडीतून फेकून दिलेली पिशवी व त्यातील हरिण जातीच्या प्राण्याची दोन शिंगे पोलिसांनी ताब्यात घेतली.
दरम्यान,यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या वरील दोघांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच घटनाक्रमातील स्वीफ्ट डिझायर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार नारायण आळे यांनी फिर्याद दिली असून बाणकोट पोलीस अधिक तपास करत आहेत. संशयीत आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.