वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महिलांच्या टी-20 प्रकारातील गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या दिप्ती शर्माने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र फलंदाजांच्या मानांकनात भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाचे स्थान एका अंकाने घसरले असून ती आता दुसऱ्या स्थानावर आहे. महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची दिप्ती शर्मा आणि पाकची सादीया इक्बाल या दोघी संयुक्त दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी प्रत्येकी समान 732 मानांकन गुण घेतले आहेत. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड 736 मानांकन गुणासह पहिल्या स्थानावर आहे.
आयर्लंड विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत पाक महिला संघाला 1-2 अशी हार पत्करावी लागल्याने सादीया इक्बालचे काही गुण कमी झाले. भारताच्या दिप्ती शर्माने टी-20 च्या अष्टपैलुंच्या मानांकन यादीत 387 मानांकन गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. या मानांकन यादीत विंडीजची हिली मॅथ्युज 505 गुणांसह पहिल्या तर न्यूझीलंडची अॅमेलिया केर 434 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या स्मृती मानधनाचे स्थान एका अंकाने घसरले असून आता ती 728 मानांकन गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडची नॅट सिव्हेर ब्रंट 731 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.









