वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून आता तिचे लक्ष्य अग्रस्थानावर राहील.
या मानांकन यादीत गेल्या 6 वर्षांच्या कालावधीत दीप्तीने पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये आपले स्थान सातत्याने राखले आहे. टी-20 प्रकारात दीप्तीने अलिकडच्या कालावधीत आपल्या कामगिरीत सातत्य ठेवल्याने तिने ताज्या मानांकन यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. आता अग्रस्थान मिळविण्यासाठी तिला केवळ 8 मानांकन गुणांची जरूरी आहे. या मानांकन यादीत पाकची सादिया इक्बाल पहिल्या स्थानावर आहे. दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाच्या सदरलँडला दुसऱ्या स्थानावरून खाली खेचले आहे. सदरलँड आता या मानांकन यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अरूंदती रे•ाrने 43 वे स्थान मिळविले आहे. टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या रॉड्रीग्जने 12 वे स्थान मिळविले आहे.









