वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकनात भारताची ऑफस्पिनर दीप्ती शर्माने एका स्थानाची प्रगती करीत टॉप पाचमध्ये स्थान मिळविले. नुकत्याच झालेल्या विंडीजविरुद्ध मालिकेत तिने केलेल्या अप्रतिम कामगिरीचा या क्रमवारीसाठी लाभ झाला आहे.
दीप्ती सध्या पाचव्या स्थानावर असून तिचे 665 रेटिंग गुण झाले आहेत. चौथ्या स्थानावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मारिझेन कॅपपेक्षा ती बरीच मागे आहे. कॅपने 677 रेटिंग गुण मिळविले आहेत. 27 वर्षीय दीप्तीने विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यात 8 बळी टिपले. शेवटच्या सामन्यांत तिने 31 धावांत 6 बळी मिळविले. भारताने तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली.
फलंदाजांमध्ये जेमिमा रॉड्रिग्सने टॉप 20 मध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली असून तिने चार स्थानांची मजल मारता 537 रेटिंग गुणांसह 22 वे स्थान मिळविले आहे. बिग हिटिंग रिचा घोषनेही सात स्थानांची प्रगती करीत 448 गुणांसह 41 वे स्थान घेतले आहे तर चिनेली हेन्रीने तिसऱ्या वनडेत अर्धशतक नोंदवत क्रमवारीत 21 स्थानांची झेप घेत 65 वे स्थान घेतले आहे. तिचे 349 रेटिंग गुण झाले आहेत.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके नोंदवणाऱ्या स्मृती मानधनाची मात्र एका स्थानाने घसरण झाली ती आता 720 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वुलवार्ट (773) व लंकेची चमारी अटापटू (733) या तिच्या पुढे आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरचीही तीन स्थानांनी घसरण झाली असून ती आता 13 व्या स्थानी आहे. विंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूजने सातवे वनडे शतक नोंदवत फलंदाजांच्या मानांकनात सहा स्थानांची झेप घेतली आहे. ती आता सातव्या स्थानावर आहे.









