वृत्तसंस्था / दुबई
इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवशीय मालिकेत दमदार कामगिरी केल्यामुळे भारताच्या दीप्ती शर्माने फलंदाजांमध्ये दहा स्थानांची मोठी झेप घेत 23 व्या स्थानावर पोहोचली आहे तर तिची सहकारी स्मृती मानधनाने मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत फलंदाजीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे इंग्लंड आणि भारताच्या खेळाडूंनी आयसीसी महिला एकदिवशीय खेळाडूंच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पहिल्या एकदिवशीय सामन्यात नाबाद 62 धावा काढल्यानंतर दीप्ती फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वात मोठी सुधारणा करणाऱ्यांपैकी एक होती. ज्यामुळे तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि भारताला 259 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात यश आले. त्यानंतर तिने दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात आणखी एक नाबाद 30 धावा केल्या. पहिल्या एकदिवशीय सामन्यात सोफिया डंकलेच्या 92 चेंडूतील 83 धावांनी इंग्लंडला मजबूत धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि तिला 24 स्थानांची बढत मिळवित 52 व्या स्थानावर पोहोचवले. 53 धावा काढणाऱ्या अॅलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स 40 स्थानांनी पुढे जावून 118 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. दरम्यान मानधनाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये 28 आणि 42 धावांसह क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर तिचे रेटिंग 727 कायम आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मात्र 17 आणि 7 धावांसह पाच स्थानांनी घसरुन 21 व्या स्थानावर पोहोचली आहे.
गोलंदाजी क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सोफी एक्लेस्टोनने आतापर्यंत मालिकेत चार बळी घेत आपले अव्वल स्थान मजबूत केले आहे. ज्यामध्ये दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात सामना जिंकणारी 3/27 अशी मॅचविनिंग कामगिरी केली. तिचे रेटिंग 747 वरुन 776 वर पोहोचले आणि ऑस्ट्रेलियन जोडी अॅशले गार्डनर (724) आणि मेगन शट (696) यांच्यावर तिची आघाडी वाढली, ज्यांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळविले आहे. इंग्लंडच्या चार्ली डीन आणि भारताच्या स्नेह राणा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले आहेत. डीनने टॉप 10 मध्ये स्थान मिळविले. कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग 625 सह दोन स्थानांनी झेप घेवून नवव्या क्रमांकावर ती पोहोचली तर राणा 12 स्थानांनी झेप घेवून 21 व्या क्रमांकावर पोहोचली. तसेच वैयक्तिक सर्वोत्तम रेटिंग 515 वर पोहोचली.
डीनने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही प्रगती केली आणि ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीसोबत संयुक्त 13 व्या क्रमांकावर पोहोचली. पहिल्या एकदिवशीय सामन्यात एक्लेस्टोनने 19 चेंडूत जलद नाबाद 23 धावा केल्या आणि मालिकेत तिच्या चार बळींसह तिला अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तीन स्थानांनी झेप घेवून 18 व्या क्रमांकावर पोहोचण्यास मदत केली.









