वृत्तसंस्था/ग्वांगजू (द.कोरिया)
येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत गुरूवारी भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे वैयक्तिक रिकर्व्हमधील आव्हान संपुष्टात आले तर 15 वर्षीय गाथा खडकेने शानदार विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपिका कुमारीने पात्र फेरीमध्ये सहावे स्थान मिळविले होते. तिसऱ्या फेरीमध्ये इंडोनेशियाच्या बिगरमानांकीत दिनंदा चौरसीयाने भारताची ऑलिम्पिक तिरंदाजपटू दीपिका कुमारीचा वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात पाच सेट्समध्ये पराभव केला. आता शुक्रवारी या स्पर्धेत 15 वर्षीय गाथा खडकेच्या कामगिरीवर लक्ष लागले आहे. गाथा खडकेचा सामना कोरियाच्या 22 वर्षीय पॅरिस ऑलिम्पिक चॅम्पियन आणि टॉपसिडेड लीम सि एयॉनशी होणार आहे. कोरियाच्या लीमने भारताच्या अंकिता भगतचा 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. तर महाराष्ट्रातील पुण्याच्या गाथा खडकेने या स्पर्धेत प्रथमच आपला सहभाग दर्शविला असून रिकर्व्ह प्रकारात तिच्याकडून भारताला पहिल्या पदकाची संधी उपब्लध झाली आहे. यापूर्वी म्हणजे 2019 साली झालेल्या स्पर्धेत डेन बॉश्चने भारताला पदक मिळवून दिले होते.
द. कोरियात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने पुरूषांच्या सांघिक रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात ऐतिहासिक सुवर्ण तर मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळविले आहे. पुण्याच्या 15 वर्षीय गाथा खडकेने अझरबेजानच्या फातिमा हुसेनीलचा पहिल्याच फेरीत 7-1 (26-26, 27-25, 27-26, 28-24) असा पराभव केला. त्यानंतर गाथाने पुढील लढतीत ब्रिटनच्या रॉजर्सवर 6-0 (28-27, 27-26, 29-28) अशी मात करत आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. तिसऱ्या फेरीतील लढतीमध्ये गाथाची खरी सत्त्वपरीक्षा ठरली. जर्मनीची ऑलिम्पिक आणि माजी विश्वचषक कांस्यपदक विजेती मिशेली बॉरविरुद्धच्या सामन्यात गाथाने पहिला सेट 28-26 असा जिंकला. त्यानंतर उभयतांमधील दुसरा सेट 27-27 असा बरोबरीत राहिला. तिसऱ्या सेट्समध्ये बॉरने गाथावर 28-27 अशी मात केली. चौथ्या सेट्समध्ये पुन्हा 28-28 अशी बरोबरी राहिली. निर्णायक सेटमध्ये गाथाने बॉरवर 6-4 असा विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या जुलै महिन्यात माद्रीद येथे झालेल्या विश्व चषक तिरंदाजी स्पर्धेत गाथा खडकेने वरिष्ठ गटात पदार्पण केले होते.









