एकाचवेळी तीन कुतुबमिनार बुडवू शकणारी नदी
पृथ्वीच्या 71 टक्के हिस्स्यात पाणी असून यात अनेक महासागर, समुद्रांसोबत 1.5 लाख नद्याही सामील आहेत. यातील अनेक नद्यांचे अस्तित्व शेकडो-हजारो वर्षांपासून आहे. पृथ्वीच्या पर्यावरणासाठी नद्यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक नद्यांच्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो, तसेच पेयजलाचा मुख्य स्रोत नदीच आहे. प्रत्येक नदीचे स्वत:चे जैववैविध्य असते.

या 1.5 लाख नद्यांपैकी जगातील सर्वात खोल नदी कुठली हे तुम्हाला माहिती आहे का? नद्यांच्या काठावर मानवी वस्ती विकसित झाल्याचे दिसून येते. नद्यांमुळे मानवाला शेतीचा विकास करण्यास मदत मिळाली. भारतात गंगा, यमुना, कोवरी, सतलज यासारख्या सुमारे 200 नद्या आहेत. यातील सर्वात खोल नदी ब्रह्मपुत्रा असून याची सरासरी खोली 124 फूटांपर्यंत आहे. परंतु जगातील सर्वात खोल नदी काँगो आहे. ही दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नदीला जायर या नावानेही ओळखले जाते. ही आफ्रिकेतील दुसरी सर्वात लांब नदी देखील आहे. सर्वाधिक पाण्याचा विसर्ग करण्याप्रकरणी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे.
काँगो नदीच्या नावावर आफ्रिकेत डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो हा देश देखील आहे. काँगो नदीची खोली 720 फूटांपर्यंत आहे. कुतुबमीनारची उंच 240 फूट आहे, म्हणजेच या नदीत तीन कुतुबमीनार एकाचवेळी स्वत:मध्ये सामावून घेण्याची क्षमता आहे. ही नदी 4,700 किलोमीटर लांब वाहणारी असून याचा उगम पूर्व आफ्रिकन रिफ्टच्या उंच पर्वतांमध्ये झाला आहे. चंबेशी नदीला देखील या काँगो नदीचा स्रोत मानले जाते. ही नदी जलविद्युत निर्मितीचा प्रमुख स्रोत आहे. सध्या या नदीवर 40 जलविद्युत प्रकल्प आहेत. यातून हजारो मेगावॅट वीज निर्माण केली जाते. याचबरोबर या नदीद्वारे मध्य आफ्रिकेचा व्यापारही होतो. या नदीद्वारे कॉफी, साखर, कापूस, तांबे, पाम ऑइलचा पुरवठा अन्य देशांमध्ये केला जातो.









