वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी अखिल भारतीय कुस्ती संघटनेने आपल्या मल्लांसाठी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या संकुलात सराव शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात भारताचा दीपक पुनिया तसेच बजरंग पुनिया लवकरच दाखल होणार आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम (टॉप्स) योजनेनुसार या वरील सराव शिबिरासाठी भारतीय मल्लांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. अमेरिकेतील हे सराव शिबीर 30 जुलैपर्यंत राहणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱया भारतीय मल्लांचा प्रवास तसेच निवास आणि आहारासाठी लागणारा खर्च केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे करण्यात येणार आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दीपक पुनिया आणि बजरंग पुनिया यांनी पदके मिळविली होती. आता या आगामी सराव शिबिरासाठी हे दोन्ही मल्ल व्हिसासाठी थांबले आहेत. व्हिसा मिळाल्यानंतर ते अमेरिकेला प्रयाण करतील.









