वृत्तसंस्था/ बाकू
अझरबेजानमध्ये सध्या सुरु असलेल्या बाकू विश्वचषक अॅपेरेटर्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताची अव्वल महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने महिलांच्या व्हॉल्ट प्रकारात चौथे स्थान मिळविले.
महिलांच्या व्हॉल्ट या क्रीडा प्रकारात दीपा कर्माकरने 13.716 गुणांसह चौथे स्थान पटकाविले. या क्रीडा प्रकारात बल्गेरियाच्या व्हॅलेनटीना गिरोगेव्हाने सुवर्णपदक पटकाविले असून कोरियाच्या चँगने 13.783 गुणासह रौप्यपदक तसेच पनामाच्या नेव्हासने 13.733 गुणासह कांस्यपदक घेतले. डोहामध्ये 17 ते 20 एप्रिल दरम्यान होणाऱ्या विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दीपा कर्माकर सहभागी होत आहे. गेल्या महिन्यात कैरोमध्ये झालेल्या एफआयजी अॅपॅरेटर्स विश्वचषक जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताच्या प्रणाती नायकने कांस्यपदक मिळविले होते.









