ध. संभाजी चौक, शिवतीर्थ-शिवाजी उद्यानात असंख्य दिवे
बेळगाव : अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचे मंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बेळगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने सोमवारी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, मिलिटरी महादेव येथील शिवतीर्थ तसेच छत्रपती शिवाजी उद्यान येथे असंख्य दिवे तेवत ठेवून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर आनंद साजरा करण्यात येत आहे. यामध्ये शिवप्रतिष्ठाननेही दीपोत्सवाचा संकल्प केला होता. शेकडो दिव्यांनी बेळगाव शहरातील महत्त्वाची स्मारके उजळून निघाली. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिवे लावून हा आनंद साजरा केला. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
गावोगावीही उजळविले दिवे
शिवप्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत बेळगाव परिसरातील सर्वच गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तींसमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन गावोगावी, गल्लोगल्ली दिवे लावून अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला.









