बेंगळुरु येथून पंतप्रधानांनी तर मडगावातून श्रीपादभाऊंनी केला शुभारंभ : एकाच दिवशी सहा प्रकल्पांचा शानदार उद्घाटन सोहळा

प्रतिनिधी /मडगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सोमवारी बेंगळुरू, कर्नाटक येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोकण रेल्वे मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण राष्ट्राला समर्पित केले. ‘मिशन 100 टक्के विद्युतीकरण – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल’ आणि रत्नागिरी, मडगाव व उडुपी येथून इलेक्ट्रिक लोको टेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या प्रकल्पावर एकूण रू. 1287 कोटी खर्च करण्यात आले आहेत.
मडगावात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, मडगावचे आमदार दिगंबर कामत इत्यादी उपस्थित होते.
कोकण रेल्वेचा नफा वाढणार : श्रीपादभाऊ
कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण झाल्याने कोकण रेल्वेला आत्ता बऱयापैकी नफा होईल. त्याचबरोबर कोकण रेल्वे प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास श्रीपादभाऊ नाईक यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. गेली 40 वर्षे प्रलंबित राहिलेल्या सहा रेल्वे प्रकल्पांना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालना दिली आहे. ही आनंदाची गोष्ट असून प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा प्राप्त होणार असल्याचे नाईक म्हणाले.
डिझेल खर्चाचे रु. 150 कोटी वाटचतील
कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण झाल्याने डिझेलवर खर्च होणारे 150 कोटी रूपये वाचतील. तसेच कोकण रेल्वे प्रदूषणमुक्त होईल असे मत वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी व्यक्त केले. कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या चार राज्यांना जोडली गेली आहे. त्याचा फायदा प्रवाशांना तसेच मालवाहू गाडय़ांना होईल असे ही ते यावेळी म्हणाले.
ही आनंदाची गोष्ट
मडगावात कोकण रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. आज कोकण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण होत आहे ही आनंदाची गोष्ट असल्याचे आमादार दिगंबर कामत म्हणाले. कोकण रेल्वेला आत्ता नफा होईल. यापूर्वी कोकण रेल्वे तोटय़ात असायची. त्यामुळे समस्या निर्माण व्हायच्या. या समस्या देखील दूर होतील असेही कामत म्हणाले.
वाजपेयींच्या काळात धावली होती पहिली ट्रेन
कोकण रेल्वेची स्थापना 1990 मध्ये मुंबई (रोहा) ते मंगळुरू (ठोकूर) दरम्यान रेल्वे लिंक बांधण्यासाठी कंपनी म्हणून करण्यात आली. 1 मे 1998 रोजी तत्कालीन माननीय पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या पूर्ण झालेल्या रुळावरील पहिली टेन 26 जानेवारी 1998 रोजी धावली होती.
मोदींच्या नेतृत्वाखली अनेक विकासकामे मार्गी
आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोष यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांच्याबाबतीत प्रचंड मजल गाठली आहे. अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत.
कोकण रेल्वे पश्चिम किनारपट्टीवरील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या घनदाट जंगलातून जाते. हा प्रदेश नैसर्गिक सौंदर्याने संपन्न आहे. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण हा या प्रदेशातील समृद्ध नैसर्गिक वारसा, वनस्पती आणि जीवजंतू यांचे संवर्धन करण्यासाठी केवळ एक महत्त्वाचे पाऊल ठरणार नाही तर त्याच्या आर्थिक विकासातही मदत करेल असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.
कोकण रेल्वेचे रेल्वे विद्युतीकरण 5 टप्प्यात पूर्ण झाले आहे जसे की, ठोकूर-बिजूर, बिजूर-कारवार, कारवार-थिवी, थिवी-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रोहा, शेवटचा विभाग रत्नागिरी-थिवी आहे जो 28 मार्च 2022 रोजी कार्यान्वयित झाला होता. सर्व लोको पायलटना इलेक्ट्रिक ट्रक्शन लोको चालवण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता कोकण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे. यामुळे उच्च परिचालन कार्यक्षमता आणि वाहतुकीची कमी युनिट खर्च होईल, त्यामुळे देशाला तसेच कॉर्पोरेशनला फायदा होईल.









