आमदार शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत भंडाऱ्यांची उधळण, ढोलतांशांचा आवाज, मर्दानी खेळांचे सादरीकरण; प्रभू शिवाजी महाराजांच्या पालखीची वाजतगाजत मिरवणूक
सातारा प्रतिनिधी
हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत भंडाऱयाची उधळण करत ढोलतांशाच्या आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणूक काढून किल्ले अजिंक्यताऱयावर दक्षिण महादरवाजाचा लोकार्पण दिमाखदार सोहळा आमदार शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत व वीरमाता, वीर पत्नी यांच्या हस्ते पार पडला. राजसदरेवर नजरेच पारण फेडणारे मर्दानी खेळ पार पडले. तेथेच वीरमाता, वीर पत्नींचा गौरव राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने करण्यात आला.
गेली सात ते आठ महिन्यापासूतन किल्ले अजिंक्यतारा येथे दक्षिण महादरवाजाच्या संवर्धनाचे कार्य राजा शिवछत्रपती परिवाराकडून सुरु होते. सुमारे 50 पायऱयांचेही काम हाती घेत पुर्ण केले. रविवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दक्षिण दरवाजाच्या लोकार्पण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळीच या सोहळय़ा निमित्ताने मुख्य दरवाजाजवळ राज्यभरातून आलेल्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी भंडाऱयाची उधळण करत गंधर्व ढोल पथकाच्या तालावर मिरवणूक पुढे पायऱयातून राजसदरेवर पोहचले. या मिरवणूकीमध्ये राज्यभरातून आलेले शिवभक्त, महिला यांचा सहभाग होता. त्यामध्ये अनेकांनी पारंपारिक पोशाख परिधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, येसूबाई, राजमाता जिजाऊ यांचे पोशाख परिधान केले होते. बाल शिवबाही या मिरवणूकीत सहभागी झाले होते. राजसदरेवर तब्बल दोन तास मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये दांडपट्टा, भाले, तलवारबाजी, लाठीकाठी, लिंबू कापणे आदी खेळाने चित्तथरारक लक्ष वेधून घेतले. दरम्यान, राजसदरेवरच भारत – पाक, भारत – चीन, कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर पत्नी, वीर माता यांचा सत्कार ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांच्याकडून यथोचित सत्कार करण्यात आला. तेथून वाजतगाजत दक्षिण दरवाजाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी नेण्यात आली. दक्षिण दरवाजाच्या ठिकाणी महिलांच्या हस्ते औक्षण करत शिवगादर म्हणत पालखीचे स्वागत करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या दरवाजाचे लोकार्पण आमदार शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत वीरमाता, वीरपत्नींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
भर उन्हात कार्यक्रमात घुमल्या घोषणा
किंल्ले अजिंक्यताऱयावर मुख्य दरवाजा, राजसदर, दक्षिण दरवाजा या रस्त्यावर जिकडे पहावे तिकडे शिवभक्त पहायला मिळत होते. भर उन्हामध्ये लोकार्पण सोहळय़ाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत वातावरणाचा नूर बदलून गेला. गडावर आलेल्या प्रत्येक शिवभक्तांना पिण्याया पाण्याची सोय करण्यात आली होती.









