उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर : चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ : बलशाली भारत निर्माणाचे आवाहन
बेळगाव : भारत आज सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहे. विद्यार्थ्यांनी पदवीनंतरही सर्वांगाने ज्ञान मिळवून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात योगदान द्यावे. बलशाही भारत निर्माणासाठी स्वत:ला वाहून घ्यावे, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी केले. येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 12 वा पदवीदान समारंभ विश्वेश्वय्या तांत्रिक विद्यापीठाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम ‘ज्ञानसंगम’ सभागृहात बुधवार दि. 3 रोजी झाला. या समारंभात मंत्री सुधाकर बोलत होते. विद्यार्थी जीवन हे आव्हाने स्वीकारण्यासाठी आहे. ज्ञानवंत, कौशल्यपूर्ण व सशक्त व्यक्ती बनून विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत राहावे,
स्वातंत्र्य व अन्याय विरोधात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचे कार्य संस्मरणीय आहे. त्यांच्या नावाने बेळगावात विद्यापीठ चालविण्यात येत आहे. देशप्रेम, स्वाभिमान व वीरांगनांचे नाव धारण केलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाने बेळगाव-विजापूर भागातील तरुणांना ज्ञान प्रदान करण्याचे कार्य चालविले आहे. विद्यापीठाचे कार्य हे या भागाचा विकासच नव्हे तर राज्य आणि राष्ट्राच्या शैक्षणिक विकासात भर घालत आहे. उच्चशिक्षण हे समाजात परिवर्तन घडवून आणू शकते. राष्ट्राचे भवितव्य घडविण्याबरोबरच नावीन्यतेला प्रोत्साहन देते. प्रगतशील समाज निर्मिती करू शकते.
विद्यापीठे ही केवळ पदवीधरांना तयार करण्याचे कार्य करीत नसून मानवी मूल्ये व सामाजिक जबाबदारी समजावून देणारी केंद्रे असतात. पदवीनंतर विद्यार्थ्यांनी समाजात योगदान देण्याची जबाबदारी पूर्ण करावी. आजच्या स्पर्धात्मक जगात माहिती आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असून शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल घडत आहेत. खासगी महाविद्यालयांतून शुल्क भरून शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. अशांना विद्यापीठे अल्प शुल्क घेऊन शिक्षण प्रदान करीत आहेत, असे मंत्री सुधाकर म्हणाले.
विश्व संस्थेचे सल्लागार आहार-कृषी संस्थेचे माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. इड्या करुणासागर (मंगळूर) यांनीही विचार मांडले. युवावर्गाने स्वातंत्र्यसेनानी, वीरांगना, राणी चन्नम्मा यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे. विद्यापीठाकडून प्रतिष्ठित पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी भावी काळात चांगले शिक्षण घेऊन समाज व किंबहुना देशाचा लौकिक वाढवावा. पदवीदान समारंभात स्वत:चा गौरव करून घेणे हे जीवनातील मोठे कार्य आहे, असे ते म्हणाले. प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी प्रास्ताविक केले. आरसीयूचे कुलसचिव संतोष कामगौड, मूल्यमापन विभागाचे प्रा. रविंद्र कदम, वित्त अधिकारी एम. ए. स्वप्ना, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग पदवीदान समारंभाला उपस्थित होता.
मानद पदवी प्रदान
उद्योजकता व सामाजिक क्षेत्रात गोपाल जिनगौडा (बेळगाव), प्रदर्शन कलाक्षेत्रात पद्मश्री पं. एस. बालेश बजंत्री, नागरिक-क्रीडा जनसेवा क्षेत्रात गोपाळ होसूर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
सुवर्णपदके प्रदान…
पदवीदान समारंभात एकूण 38,512 विद्यार्थ्यांना व 5909 पदव्युत्तरांना पदवी प्रदान करण्यात आली. महेश्वरी तेगूर यांना दोन सुवर्णपदके व विनायक तेली, कुमारेश कातरकी, ऐश्वर्या पाटील, पौर्णिमा देसाई, शिवकुमार सरदार, विनय घुळप्पनवर, सुजाता केस्ती, निवेदिता काटकर, संगीता बसगौडनवर यांना प्रत्येकी एक सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर 123 जणांना पीएचडी देण्यात आली. ‘इ-विद्या अॅप्लिकेशन’ अॅपचे अनावरणही यावेळी झाले.









