अनगोळ संभाजी महाराज पुतळा प्रकरणी मनपाला निवेदन
बेळगाव : अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा घाईगडबडीत उरकला जात आहे. त्यामुळे चौथऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच सर्वांना विश्वासात घेऊन लोकार्पण सोहळा पार पाडावा, या मागणीसाठी अनगोळ येथील तरुणांनी महानगरपालिकेत आयुक्तांच्या नावे निवेदन दिले. अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अद्यापही चौथऱ्याचे काही काम बाकी आहे. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतरच सर्वानुमते चर्चा करून लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात यावा, असे ग्रामस्थांच्या बैठकीत ठरले असतानाही काही जणांनी घाईघाईने लोकार्पण सोहळा उरकण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पण हा लोकार्पण सोहळा मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. असे असतानाही काही जण मनमानी पद्धतीने लोकार्पण सोहळा उरकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकार्पण सोहळ्याला आपला विरोध नसून केवळ अर्धवट काम असताना लोकार्पण करणे चुकीचे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महानगरपालिकेत दाखल झालेले कार्यकर्ते, महापौर आणि उपमहापौर यांच्या कक्षाकडे निवेदन देण्यासाठी गेले. पण महापौर आणि उपमहापौर दोघेही अनुपस्थित होते. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या नावे आवक विभागात निवेदन देण्यात आले.









