पाणी बचतीसाठी जागृतीची आवश्यकता : यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने समस्या
बेळगाव : पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने यंदा डिसेंबरपासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांच्या पाणीपातळीतही घट होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणीसमस्या अधिक तीव्र होण्याची चिंता व्यक्त होत आहे. शहराला दररोज 136 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी हिडकल जलाशयातून 82 एमएलडी आणि राकसकोप जलाशयातून 54 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, राकसकोप जलाशयाची पाणीपातळी खाली गेल्याने सध्या जलाशयातून केवळ 34 एमएलडी पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे.
हिडकल जलाशयावर पाण्याचा अतिरिक्त ताण
गतवर्षी फेब्रुवारीपासून पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे दोन्ही जलाशयांची पाणीपातळी कमी झाली आहे. हिडकल जलाशयाची कमाल पाणीपातळी 2175 फुटांवरून 2154 फुटांवर आली आहे. तर राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2478 फुटांवरून 2470.9 फुटांवर आली आहे. त्यामुळे पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. राकसकोप जलाशयातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. तर हिडकल जलाशयातून शहराबरोबर हुक्केरी, संकेश्वर आदी शहरांनाही पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हिडकल जलाशयावर पाण्याचा अतिरिक्त ताण आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जलाशय, नदी-नाले आणि तलावांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. विशेषत: अवकाळी आणि इतर पाऊसही कमी झाल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी खाली जाऊ लागली आहे. शिवाय गतवर्षी मान्सूनही उशिराने दाखल झाला होता. त्यामुळे जून, जुलै दरम्यान भरपावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे डेडसाठ्यातील पाण्याचा उपसा करावा लागला होता.
पडिक विहिरी-कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरातील देखभालीविना पडून असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. वापराविना पडलेल्या शेकडो विहिरी पुन्हा वापरात आणल्यास काही अंशी पाणीसमस्या मार्गी लागणार आहे. राकसकोप जलाशयाच्या भिंतींना तडे गेल्याने पाणी वाया जाऊ लागले आहे. त्यामुळे जलाशयाच्या भिंतींच्या दुरुस्तीचीही मागणी होऊ लागली आहे.
पाणी पातळी (फुटामध्ये)
- जलाशय जानेवारी जानेवारी
- 2023 2024
- राकसकोप 2468 2470
- हिडकल 2152 2154
पाण्याची बचत करा
गतवर्षीपेक्षा यंदा दोन्ही जलाशयांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केले जात आहे. शहरातील चार हजार नळांना दररोज पाणी सोडले जात आहे. नागरिकांनीही पाण्याची बचत करून सहकार्य करणे गरजेचे आहे.
– हार्दिक देसाई (एल अँड टी जनरल मॅनेजर)









