टोमॅटो प्रतिकिलो 80-100 रुपये, सर्वसामान्य अडचणीत
► प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसू लागला आहे. डाळी, कडधान्य आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना दैनंदिन जीवन जगणे कठीण होऊ लागले आहे. विशेषत: बीन्स, ढबू, ओली मिरची, लसूण, आलं, दोडकी, गवार आदी भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याऐवजी अंड्यांना पसंती देऊ लागले आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात कोबी 20 रु., शेवग्याच्या शेंगा 10 रु. टोमॅटो 80 ते 100 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, बीन्स 100 रु. किलो, ढबू 100 रु. किलो, घेवडा 100 रु. किलो, ओली मिरची 100 रु. किलो, वांगी 60 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, दोडकी 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, फ्लॉवर 20 रुपये एक, गवार 80 रु. किलो, कोथिंबीर 20 रुपये पेंडी, कांदापात 20 रुपयाला 5 पेंड्या, लालभाजी 10 रुपयाला दोन, शेपू 10 रुपयाला एक पेंडी, पालक 20 रुपयाला 4 पेंड्या, मेथी 20 रुपयाला दोन पेंड्या, जवारी लसूण 100 रु. किलो, आले 280 रु. किलो असा दर आहे.
पाऊस लांबणीवर पडल्याने नवीन भाजीपाला उत्पादन कमी झाले आहे. बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे दर वाढू लागले आहेत. पावसाळ्यात स्थानिक शिवारातून भाजीपाला उत्पादन होत नाही. त्यामुळे दर वाढलेले पहायला मिळत आहेत. मागील महिन्याभरापासून भाजीपाल्याचे दर हळूहळू वाढू लागले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत शनिवारी पालेभाज्यांचे दर काहीसे कमी होते. 25 रुपये विकणारी मेथीची पेंडी 10 रुपये झाली होती. त्याबरोबर पालक, शेपू, लालभाजी आणि कांदापात भाज्यांचे दरदेखील कमी झालेले पहायला मिळाले.
टोमॅटोच्या दराने हैराण
टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. एका किलोसाठी 80-100 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना टोमॅटो नको रे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे. आवक कमी झाल्याने टोमॅटो दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गोरगरीब जनता टोमॅटोच्या दराने हैराण झाले आहे. शिवाय खरेदी करणे देखील अशक्य बनले आहे.
आंबा हंगाम अंतिम टप्प्यात
आंब्यांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. मात्र रिमझिम पाऊसदेखील पडत असल्याने आंब्यांची विक्री मंदावल्याचे दिसत आहे. हापूस, तोतापुरी, निलम आणि इतर आंब्यांची विक्री सुरू आहे.
लिंबू स्वस्त
मागील महिन्यात सात रुपयाला विकला जाणारा लिंबू दोन रुपये एक झाला आहे. लिंबूची आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत. विशेषत: लोणचे घालण्यासाठी गृहिणीकडून लिंबू खरेदी केली जात आहे.









