सांगली :
गावभागातील केशवनाथ मंदिरजवळ पाटील गल्लीत बंद वाड्यात सडलेल्या स्थितीतील अनोळखी मृतदेह शनिवारी रात्री आढळून आला. हा मृतदेह पाहण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. खून करून मृतदेह याठिकाणी टाकला आहे, अशी अफवा पसरली होती. पोलिसांनी तात्काळ याठिकाणी येऊन पाहणी करून हा मृतदेह ताब्यात घेवून वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरापर्यंत या मृतदेहाची ओळख पटली नाही.
गावभागातील पाटील गल्लीतील चौगुले वाडा अनेक दिवसांपासून बंद आहे. या वाड्याच्या परिसरातून दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना कळवले. शहर पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण केले. बंद वाड्यात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये सडलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह आढळून आला. बाजूला दारूच्या बाटल्या आढळून आल्या. किमान महिन्यापूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मृत व्यक्ती अंदाजे ५० वर्षांची आहे अंगावर हाफ गोल गळ्याचा शर्ट व बरमुडा आहे. डाव्या पायाच्या घोट्याजवळ काळा दोरा ही बांधलेला आहे. या व्यक्तिरिक्त मृत व्यक्तीजवळ कोणताही पुरावा आढळला नाही. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, आकाश कोलप, अमर तेलसंग आदींनी मृतदेह बाहेर काढून सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवला.
दरम्यान रात्रीच्या सुमारास हा मृतदेह आढळून आल्यानंतर या परिसरातील नागरिकांना कोणाचा तरी खून झाला असावा असा संशय आला आणि ही अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरली आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत याबाबत वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयाच्या डॉक्टरांकडून प्राथमिक माहिती घेवून हा खून नसून नैसर्गिक मृत्यू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. ही व्यक्ती कोण आहे याचा तपास सुरू आहे.








