केवळ दहा दिवस पुरेल एवढेच पाणी : ओपा, साळावलीची स्थिती चांगली,पाऊस न पडल्यास गंभीर संकट?
पणजी : अणजुणे धरण प्रकल्पात पुढील 10 दिवस पुरणार एवढाच जलसाठा आता शिल्लक राहिलेला आहे. या धरण उभारणीनंतर प्रथमच अशी गंभीर परिस्थिती उद्भवलेली आहे. जूनचा तिसरा आठवडा उलटला तरी पाऊस नसल्याने ही स्थिती आहे. या आठवड्यात पाऊस आला तरच स्थितीमध्ये सुधारणा होईल अन्यथा डिचोली, सांखळी, सत्तरीच्या काही भागाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. घाट माथ्यावर पडलेल्या पावसामुळे ओपा तर सांगे, केपेतील पावसामुळे साळावली जलाशयाची स्थिती त्या तुलनेत चांगली आहे. तिळारीमुळे बार्देश व पेडणेचा प्रश्न सुटलेला आहे, मात्र डिचोली तालुक्याला फटका बसण्याची शक्यता आहे.
अणजुणेसमोर प्रथमच संकट
जलस्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता प्रमोद बदामी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सर्व ठिकाणी जलवितरणात सध्या कोणताही खंड पडलेला नाही. केवळ पाण्यासाठी संघर्ष करण्याची पाळी प्रथमच उद्भवलीय ती अणजुणे धरणासाठी. अणजुणे धरण उभारल्यापासून इतिहासात प्रथमच या धरणातील पाण्याने तळ गाठलेला आहे. अशी परिस्थिती कधीही उद्भवलेली नव्हती. यंदा पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे सध्या केवळ 7 दिवस पुरेल, एवढाच शिल्लक जलसाठा अणजुणे धरणात आहे. आजूबाजूला थोडेफार पाणी आहे ते घेतल्यास डिचोली, सांखळी व सत्तरीच्या काही भागाला केवळ 10 दिवसांपर्यंत पाणीपुरवठा करता येईल. धरणात पाणीसाठा शिल्लक नाही, अशी स्थिती आजवर कधीही घडली नव्हती. यंदा प्रथमच समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
घाट माथ्यावर पावसामुळे म्हादईत पाणी
ओपा येथेही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते, मात्र गेल्या दोन आठवड्यात घाट माथ्यावर पडलेल्या पावसामुळे म्हादई नदीमध्ये नव्याने जलसाठा तयार झालेला आहे. यंदा म्हादईचा वाहण्याचा प्रवाह पूर्णत: बंद झाला होता, मात्र घाट माथ्यावरील पावसामुळे म्हादई थोडीफार वाहू लागली. किंचित प्रमाणात पाणी वाहणे याचा अर्थ म्हादईमध्ये थोडे पाणी आलेले आहे. त्याचा विचार करता हे पाणी ओपा जलशयात सोडणे चालू आहे. ओपाला दिवसाकाठी 160 एमएलडी पाणी लागते. ज्यामधून तिसवाडी व फोंडा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते.
ओपात दीड महिना पुरेल एवढा जलसाठा
बंद पडलेल्या खाणींमधून आम्ही दिवसाकाठी 30 एमएलडी पाणी खेचून घेतो. म्हादईमधून 70 एमएलडी पाणी मिळतेय. याशिवाय साळावलीमधून थोडे पाणी खेचून घेतल्याने सध्या बंधारे भरलेले आहेत. आणखी एक ते दीड महिना पुरेल एवढा जलसाठा ओपामध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती प्रमोद बदामी यांनी दिली. साळावली जलाशयाच्या परिसरात सांगे, केपे आदी भागात अलिकडेच पडलेल्या जोरदार पावसामुळे परिस्थिती एकदमच खराब राहिलेली नाही. जलाशयात थोडाफार नव्याने पाणीसाठा झाला आहे. या धरणात असलेला पाणीसाठा आणखी एक महिना सहज पुरेल एवढा आहे. तिळारीमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पोहोचणार एवढा जलसाठा असल्याने पेडणे व बार्देशमध्ये पाण्याची गंभीर समस्या सध्यातरी राहणार नाही.
प्रतीक्षा पावसाची
या आठवड्याच्या अखेरीस तरी गोव्यात पाऊस यावा. अन्यथा परिस्थिती थोडी गंभीर बनणार आहे. जलस्रोत खाते आता पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. पुढील चार दिवसांत पाऊस झाला नाही तर पोडोशे प्रकल्पातून दिवसाआड एकदा पाणीपुरवठा करण्याची पाळी सार्वजनिक बांधकाम खात्यावर येऊ शकते.









