कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे, गेल्या पाच वर्षातील विद्यार्थी संख्या पाहता, पारंपरीक अभ्यासक्रमात प्रतीवर्षी विद्यार्थी कमी होत आहेत, असे चित्र आहे. त्यातूनच पारंपरिक अभ्यासक्रमात पदवी प्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे.
पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अकरावीपासून घटत आहे. पारंपरिक अभ्यासक्रमात बदल होत आहेत. तरीही विद्यार्थी संख्या वाढत नसल्याने पदवी प्रमाणपत्र घेणाऱ्यांची संख्या घटणे साहजिकच आहे. विद्यार्थी वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत समारंभात १० वर्षापुर्वी लाखो विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घ्यायचे. दीक्षांत समारंभाला विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांनी फुलून जायचा. परंतु व्यवसायिक अभ्यासक्रमामुळे विद्यापीठांतर्गत पारंपरिक अभ्यासक्रमाला विद्यार्थी कमी होत आहेत. विज्ञान – शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील घटत आहे. यंदा तर प्रवेशपूर्व परीक्षेविना मागेल त्याला प्रवेश देण्याचे धोरण राबवले जात आहे. तरीदेखील विद्यार्थी संख्या वाढत नसल्याची चर्चा आहे.
- पीएच. डी. पदवीमध्ये वाढ
एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. केल्यानंतर विद्यार्थी एम.फिल. पीएच.डी. करतात. २०२१ ला १७१ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली, ३५ विद्यार्थ्यांनी एम. फिल. केले. २०२४ ला ३०० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. तर १८ जणांनी एम.फिल. केले. पीएच. डी. करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
- व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे ओढा
व्यवसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती करणे शक्य होते. अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य विकास होतो, परदेशी भाषा शिकता येतात. पारंपरिक अभ्यासक्रम कौशल्याधिष्ठीत नाहीत, त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे. व्यवसायिककडे ओढा वाढत आहे.
– डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ








