गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साडेतीन मीटर्स जास्त घट, मात्र पुढील तीन महिने पुरवठा करता येईल इतका साठा उपलब्ध
सांगे : दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी आणि गोव्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या सांगे येथील साळावली धरणातील पाणीसाठा सध्या घटला आहे. यंदा पावसाचे आगमन लांबल्याने पाण्याच्या समस्या वाढल्या आहेत. साळावळी धरणाच्या जलाशयावरही त्याचा परिणाम झालेला आहे. सध्या पाण्याची पातळी 29.18 मीटर इतकी असून गेल्या वर्षी ही पातळी 32.62 मीटर इतकी होती. यंदा साळावली धरणातून लवकर म्हणजे 15 नोव्हेंबरला कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे साडेतीन मीटर्स इतकी पाण्याची पातळी जास्त घटली आहे. यंदा साळावली धरणाचा जलाशय खूप ओसरल्याचे दृष्य पाहावयास मिळत आहे. यावर्षी उष्मा भरपूर वाढला असून त्यातच पावसाळा पुढे गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. दक्षिण गोव्याला पिण्याचे पाणी तसेच शेतीला पाणी पुरविणाऱ्या साळावली धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी एकूण 11.97 मीटर्सनी घटली आहे. साळावली धरण हे दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्याचीही तहान भागवते.
तीन महिने पुरेल इतके पाणी
पत्रकारांच्या एका तुकडीने शुक्रवारी सकाळी पाजीमळ, सांगे येथील जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता जेसन मिनेझिस यांची भेट घेतली असता साळावली धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे त्यांनी मान्य केले. पाणीसाठ्यात घट आली असली, तरी पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अजून पुरेसा पाणीसाठा असून पाऊस पडला नाही, तरी पुढील तीन महिने पुरेल इतके पाणी जलाशयात आहे, असे मिनेझिस यांनी सांगितले.
मुख्य कालव्यातून पाणी सोडणे बंद
दक्षिण गोव्यातील सर्वांत महत्त्वाचा असा हा पाणीपुरवठा प्रकल्प असून त्यातून मोठ्या प्रमाणात शेतीलाही पाणीपुरवठा होतो. वास्कोपर्यंतच्या जनतेची तहान त्याच्याकडून भागविली जाते. वेर्णा येथील औद्योगिक वसाहत व इतर लहान-मोठे उद्योग यांना हेच पाणी पुरविले जात असे. या धरणाची उंची 41.15 मीटर इतकी असून जलाशयाने सुमारे 24 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. खबरदारी म्हणून शुक्रवारपासून मुख्य कालव्यातून पाणी सोडणे बंद केले आहे. तसेच दोन आठवड्यांपूर्वी काले नदीत पाणी सोडणे बंद केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मिनेझिस यांनी दिली. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी शेळपे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि ‘जायका’चा असे दोन जलशुद्धिकरण प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांची क्षमता 100 एमएलडी आणि 160 एमएलडी पाणी खेचून शुद्ध करून पुरविण्याची आहे. मिनेझिस यांनी दिलेल्या माहितीमुळे जनतेने घाबरण्याची गरज नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात साधारणपणे जुलै महिन्याच्या मध्यास धरणाचा जलाशय तुडुंब भरून वाहू लागतो. पाण्याची पातळी 41.15 मीटर्सवर आली की, जलाशयाच्या मुखातून पाणी बाहेर पडू लागते.
गाळ उपसण्याची गरज
सध्या जलाशयात 29.18 मीटस इतके पाणी असल्याने अजून 9 मीटर्स पाणी वापरता येणार आहे. एकदा का 20 मीटर्सच्या खाली पाण्याची पातळी गेली की, ते वापरणे कठीण होऊन बसते, असे जलस्रोत खात्याकडून समजले. साळावली धरणाच्या जलाशयातील गाळ उपासण्याचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला आहे. पण धरण बांधून 40 वर्षे पूर्ण होत आली, तरी गाळ कधी उपसला गेलेला नाही. त्यामुळे गाळ उपसण्याची मागणी होत आहे. एकदा का पाऊस सुरू झाला की, काही दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. साळावलीच्या जलाशयातून कालव्यात विसर्ग सुरू केला की, पाणी हळूहळू कमी होऊ लागते. त्यातच किती पाऊस पडला यावरही मोजमाप अवलंबून असते. गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याच्या पातळीत घट आली नव्हती. मात्र यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच पातळी घटली.









