प्रवासी संख्येत राज्यात तिसऱया स्थानी असणाऱया बेळगाव विमानतळाची चौथ्या स्थानी घसरण
प्रतिनिधी /बेळगाव
अनियमित विमानफेऱयांमुळे बेळगाव विमानतळावरील प्रवासी संख्या मागील तीन ते चार महिन्यांत कमालीची घटू लागली आहे. प्रवासी संख्येत राज्यात तिसऱया स्थानी असणारे बेळगाव विमानतळ आता मात्र चौथ्या स्थानी पोहोचले आहे. प्रत्येक महिन्यात हजार ते दोन हजार प्रवासी संख्या कमी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात 22 हजार 566 प्रवाशांनी प्रवास केला आहे. ऑगस्ट महिन्यात 23 हजार 145 प्रवाशांनी प्रवास केला होता. ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये 579 प्रवाशांची संख्या घटली आहे. केवळ प्रवासी संख्याच नाही तर कार्गो वाहतुकीमध्येही घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात 14.9 टन झालेली कार्गो वाहतूक सप्टेंबर महिन्यात मात्र 7.54 टनावर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
विमानफेऱयांवरही होणार परिणाम
प्रवासी संख्या अशाच पद्धतीने कमी होत गेल्यास याचा परिणाम कमी प्रवासी संख्या असणाऱया विमान फेऱयांवर होणार आहे. प्रवासी कमी असल्यास ती विमानफेरी बंद होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविणे गरजेचे आहे. विमान प्रवाशांची संख्या वाढल्यास त्याचा फायदा केवळ विमान कंपन्यांनाच नाही तर विमानतळाच्या विकासाला, यावर अवलंबून असणाऱया पूरक व्यवसायांना होणार आहे.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
प्रवासी संख्येने मागील अनेक वर्षांपासून दुसऱया स्थानी असणारे बेळगाव आता तिसऱया स्थानी पोहोचले आहे. बेळगावशेजारी असणाऱया हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नातून अनेक नवीन शहरांना विमानफेऱया सुरू झाल्या. बेळगावात मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे याचा परिणाम विमान फेऱयांवर होत आहे. नवीन विमानफेरी सुरू करण्यासाठी पाठपुरावा होत नसल्यामुळे विमान कंपन्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
दिल्ली-बेळगाव विमान फेरी सुरळीत करा
स्पाईस जेट कंपनीच्या तांत्रिक कारणामुळे दिल्ली-बेळगाव-दिल्ली अनियमित झाली आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवासी संख्येवर झाला आहे. दररोज या फेरीमधून 300 ते 350 प्रवासी प्रवास करीत होते. परंतु विमानफेरीच रद्द करण्यात येत असल्याने प्रवासी संख्येवर परिणाम होत आहे. त्यामुळे दिल्ली येथे प्रवास करणाऱयांना नाईलाजास्तव हुबळी अथवा गोव्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दिल्ली-बेळगाव विमान फेरी सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









