वांगी पुन्हा वाढली, भाजीपाला बाजार तेजीत
प्रतिनिधी/ बेळगाव
आठवडी बाजारात भेंडी, टोमॅटो, फ्लॉवर आणि कोबी दरात घसरण झाली आहे. मागील आठवड्यात 40 रुपये किलो असणारी भेडी 20 रुपये किलो झाली आहे. तर कोथिंबीर पुन्हा वाढली आहे. 20 रुपये पेंडीप्रमाणे विक्री होवू लागली आहे. इतर भाज्यांचे दर मागील आठवड्याप्रमाणेच स्थीर आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात रताळी आणि इतर साहित्यांना मागणी वाढू लागली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात बटाटा 30 रुपये किलो, कांदे 30 रुपये किलो, काकडी 60 रुपये किलो, दोडकी 60 रुपये किलो, कारली 40 रु. किलो, फ्लॉवर 20 रुपये, ढबू 40 रुपये, भेंडी 20 रु. किलो, गवार 60 रुपये, बिन्स 50 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, गाजर 60 रुपये, टोमॅटो 15 रुपये, फ्लॉवर 10 रुपये, कोथिंबीर 20 रुपये पेंडी, शेवग्याच्या शेंगा 20 रुपये एक, लाल भाजी 10 रुपयांना 1, मेथी 20 रुपयांना एक पेंढी, कांदापात 20 रुपयाला 5 पेंढ्या, पालक 10 रुपयांना दोन, शेपू 10 रुपयांना 2 असा भाजीचा दर आहे.
यंदा पावसाअभावी भाजीपाला लागवड घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर भडकण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजीपाल्याचा दर स्थीर आहे. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत वांगी, ढबू, दोडकी, मेथी आदी भाज्यांचा दर वाढू लागले आहेत. यंदाच्या वर्षात पालेभाज्यांमध्ये मेथीचे दर अधिक असल्याचे दिसत आहे. उत्पादन कमी असल्याने मेथीची आवक देखील कमी दिसू लागली आहे. त्यामुळे बाजारात दर टिकून आहे.
नवरात्रोत्सवात वाढणार मागणी
नवरात्रोत्सवात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाय मांसाहार देखील वर्ज्य केला जातो. त्यामुळे या काळात भाजीपाल्याला मागणी वाढेल, अशी माहितीही किरकोळ भाजी विक्रेत्यांतून दिली जात आहे. नवरात्रोत्सवात महाप्रसाद आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी-विक्री वाढणार आहे.