कोल्हापूर :
कळंबा तलावत यंदा अपेक्षेप्रमाणे मत्स्य उत्पादन झाले नसल्याने मच्छीमारांच्या आशा पाण्यात गेल्या आहेत. मे महिन्यात लागणाऱ्या अनिश्चित पावासामुळे, वातावरणातील बदल आणि प्रदूषण यामुळे 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे. तलावामध्ये सहा लाख मत्स्य बीजे सोडली होती. मात्र वातावरणातील सततच्या बदलामुळे मच्छ बीजांची पूर्णपणे वाढ झाली नाही. त्यामुळे मच्छीमारांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव तुडुंब भरला होता. मच्छीमाऱ्यांनी राहू, कटला, मिरगल, टिलापिया, शेंगाळा, यांसारख्या विविध जातींच्या सहा लाखाहून अधिक मत्स्य बीज तलावामध्ये सोडले होते. दीड वर्षांच्या संगोपनानंतर यंदाच्या हंगामात मासेमारी सुरु झाली मात्र जाळयामध्ये म्हणावे तसे मासे सापडले नसल्याचे चित्र समोर येत आहे.
विशेषत: वातावरणातील सातत्याने होणारे बदल आणि मुसळधार पावसामुळे सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात मासे आणि बीज वाहून गेले असल्याची शंका मच्छीमाऱ्यांमध्ये होत आहे. यामुळे यंदाच्या हंगामाला मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
2024 च्या पावसाळयामध्ये तलावामध्ये पाण्याचा मुबलक साठा झाला होता. म्हणून मच्छीमाऱ्यांनी रंकाळा मत्स बीज संगोपन केंद्र, कर्नाटक, पुणे येथील बीज केंद्रातील सहा लाखाहून अधिक बीज कळंबा तलावात सोडले होते. पण वातवरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
- जलजीवांचे अस्तित्व धोक्यात
गेल्या काही वर्षांपासुन पंचगंगा नदी, रंकाळा तलाव यामधील मासे मोठ्या प्रमाणामधे मृत्यूमूखी पडत असल्याचे दिसत आहे. नदी, तलावांमध्ये अनेक कारणामुळे प्रदुषण होत आहे. यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे येथील मासे मृत्यूमुखी पडल्याचे चित्र आहे. तसेच कळंबा तलावात नागरी वस्ती व उद्योग व्यवसायातील सांडपाणी मिसळत आहे. यामुळे तलावातील मासे, कासव, पानसर्प, यासह अनेक जातींच्या जलजीवांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे.








