शेतकऱ्यांचे शेतीकर्ज पूर्णपणे माफ करा : रयत संघ-खानापूर तालुका हसिरु सेनेचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा
खानापूर ; राज्य रयत संघ आणि खानापूर तालुका हसीरु सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. बेळगाव तालुका आणि खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. खानापूर तालुक्यात आणि बेळगाव तालुक्यात यावर्षी अजिबात पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. मात्र सरकारने अद्याप हे दोन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असल्याचे यावेळी प्रकाश नाईक यांनी बोलताना सांगितले.
खानापूर तालुक्यातील संपूर्ण खरिपाचे पीक वाया गेले असून सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे संपूर्ण पिके करपून गेली आहेत. यात भात, ऊस, बटाटा, रताळी, मका, सोयाबीन यासह सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले असल्याने शेतकऱ्याना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यासाठी शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळवून द्यावा, तसेच शेतकऱ्यांचे सर्व कर्ज तातडीने माफ करावे, खानापूर तालुका आणि बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसेच आठ दिवसात याबाबत सरकारने निर्णय घेतला नसल्यास खानापूर तालुका महामार्गावर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी या निवेदनाद्वारे देण्यात आला. या मागणीचे निवेदन खानापूरचे उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांना देण्यात आले. त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून हे निवेदन आपण मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी खानापूर तालुका रयत संघाचे अशोक यमकनमर्डी, प्रकाश नाईक, किशोर मिठारी, गुरुलिंय्या हिरेमठ, शिवाजी आंबडकट्टी, पुंडलिक ऊळ्ळाग•ाr यासह पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









