एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्या : हलगा परिसरातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसामुळे शिवारातील पिके पूर्णपणे खराब झाली आहेत. तेव्हा बेळगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे. प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हलगा व परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नावे हे निवेदन देण्यात आले आहे.
यावर्षी पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी महागाने बी-बियाणे तसेच खते खरेदी करून त्याचा वापर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. शेतकरी कर्जबाजारी होत असून तो अडचणीत आला आहे. तेव्हा संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
अप्परजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. अण्णासाहेब घोरपडे, अॅड. सुभाष भोसले, अॅड. आर. एल. नलवडे, अॅड. वाय. के. दिवटे, शेतकरी रामलिंग कामाण्णाचे, पिराजी सामजी, बाळू मऱ्याकाचे, कृष्णा हणमंताचे, गणपत मारिहाळकर, सागर कामाण्णाचे, राजू बडगेर यांच्यासह शेतकरी आणि वकील उपस्थित होते.









