शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा : रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : पावसाने दडी मारल्याने शेतवडीतील पिके करपू लागली आहेत. तर काही भागात मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कर्ज काढून पिके घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करण्यात यावे व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नेगील योगी रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मान्सूनच्या आशेवर शेतकऱ्यांकडून काही भागात पेरणी केली आहे. तर काही भागात पाऊस झाल्याने भातरोप लागवड व इतर प्रकारची पिके घेण्यात आली. पिके बहरात असतानाच पावसाने दडी मारल्याने हाताला आलेली पिके करपू लागली आहेत. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकऱ्याचे कष्ट वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी विविध बँक व सहकारी संस्थांमधून कर्ज काढून शेती केली आहे. मात्र पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यासाठी दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांनी विविध बँका व सहकारी संस्थांमधून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 35 हजार भरपाई द्यावी, शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, ऊस पिकाला 4500 रुपये भाव देण्यात यावा, एफआरपी 150 रुपये देण्यात यावा, कारखान्याकडे असणारी शेतकऱ्यांची बाकी त्वरित देण्यात यावी, भात, सोयाबीन, मका, ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल, कापूस आदी पिकांच्या खरेदीसाठी एपीएमसीमध्ये केंद्रे निर्माण करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यात यावे, भाजीपाला पिकाला केरळच्या धर्तीवर हमीभाव जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी कल्लाप्पा हरियाळ, शिवानंद तुरमुरी, निलव्वा शिंत्री, हणमंत हुलमनी, बेनप्पा गोडची आदी उपस्थित होते.
चार दिवसांत पाऊस न पडल्यास मोठी समस्या
मागील महिन्यांपूर्वी संततधार पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दांडी मारली असून सर्वच पिकांना आता पावसाची गरज निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण कायम असून दोन दिवसांपूर्वी हलक्मया सरी पडल्या. मात्र तालुक्मयात पावसाची गरज निर्माण झाली आहे. येत्या चार दिवसांत पाऊस बरसला नाही तर पिकांना फटका बसण्याची शक्मयता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून राहिल्या आहेत. तसेच आणखी पाऊस न झाल्यास भविष्यात पाण्याची समस्याही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. गतवर्षी शासकीय अधिकाऱ्यांनी पिकांचा सर्व्हे करून अहवाल दिला होता. यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. तर काही शेतकरी विहिरीतील पाणी सोडून पिकांना जिवंत ठेवण्याचे काम करू लागले आहेत. परिणामी याचा फटका पिकांना बसत आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार, याच आशेवर सारेजण आहेत. पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत पिकांचा निभाव लागला आहे. पण यापुढील काळात पावसाची नितांत गरज आहे. ग्रामीण भागातील विहिरींनी पुन्हा तळ गाठण्यास सुऊवात केली आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा साऱ्यांना लागली आहे. भात, सोयाबिन, बटाटा, भुईमूग, रताळी या साऱ्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास जनावरांना चारा प्रश्नही गंभीर बनणार आहे.









