शेतकरी संघटनेची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पिके करपत आहेत. विहिरी, तलाव, कूपनलिकांचे पाणी अटले आहे. यामुळे असलेली पिकेही वाळून जात आहेत. यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन अखंड कर्नाटक राज्य रयत संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खरिप हंगामातील पाऊस अपेक्षित प्रमाणात पडला नसल्याने पेरणी खोळंबली आहे. तर काही भागात केलेली पेरणी वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ऊस पिकेही करपू लागली आहेत. धूळवाफ पेरणी वाया गेली आहे. पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही उभा ठाकला आहे. अशा अनेक समस्या असतानाही कोणत्याच सरकारी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना राबविण्यात याव्यात, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष बसवराज डोंगरगावी, बसवराज हण्णीकेरी, महादेव अरगंजी, सुरेश पगडी आदी शेतकरी उपस्थित होते.









