स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे तातडीने बेळगाव जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून सरकारने घोषित करावा, अशी मागणी स्वाभिमानी राज्य शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पिकांची पेरणी करूनही पिके उगवली नाहीत. सोयाबिन, मूग, चवळी, कापूस ही पिके आता खराब झाली आहेत. तेव्हा सरकारने तातडीने याबाबत लवकर निर्णय घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, रासायनिक खतांचादेखील पुरवठा करावा. कारण दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने बी-बियाणे व खते मोफत द्यावीत, असे या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर सर्व कर्ज माफ करावे. कर्ज वसुलीसाठी बँका व सोसायट्यांकडून होणारा त्रासदेखील थांबवावा, अनेक शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केली आहे. यापुढेही आत्महत्या होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा बँकांनी कर्ज वसुली करू नये, यासाठी आदेश काढावा, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिवनसिंग मोकाशी व शेतकरी उपस्थित होते.









