संख, वार्ताहर
जत तालुका दुष्काळ जाहीर करून, शासनाच्या विविध योजना तात्काळ पोहोचवण्यात याव्यात, म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागातील वंचित गावामध्ये सोडावे, तात्पुरती स्वरूपात तुबची योजनेचे पाणी देण्यासाठी करार करावा, विस्तारित योजनेचे काम तातडीने सुरु करावे आदी मागण्यासाठी सरकारचे लक्ष वेधत जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संख येथील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार पासून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे.
आज पासून सलग तीन दिवस हे आंदोलन चालणार असून, पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. दुष्काळ जाहीर करा, नाहीतर कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी द्या अशी जोरदार मागणी आंदोलकानी केली आहे.
सोमवारी सकाळी साडे दहा पासून या चक्री आंदोलनास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी दरिबडची व संख जिल्हा परिषद गटातील शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या उपोषणाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी केले. यावेळी सुजय नाना शिंदे, युवराज निकम, बाबासाहेब कोडग, अपराया बिरादार, जलिंधर व्हणमाने, पिरापा माळी, गणी मुल्ला, भूपेंद्र कांबळे, निलेश बामणे, अनिल पाटील, भारत सुर्यवंशी,शिव बिरादार,मारुती पवार, सलीम पछापुरे, महादेव कोळी, अशोक बनेंनवर, बिरप्पा शिंदे, बाबासाहेब माळी, हिंदुराव शेंडगे, महादेव पाटील, सुरेश कटरे, तात्या चव्हाण यांच्या सहा दरीबडची दरिकोंनुर, आसंगी जत, संख, करेवडी, को बोबलाद, तिकोंडी, गोंधलीवडी, सिधनाथ, मोटेवडी, खडणाल, पांडोझरी, धुळकरवडी कागणरी, जलिहाल, कोणबघी आदी 25 गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत.
जत तालुक्यात आज पर्यंत फक्त आश्वासन मिळाले. परंतु प्रत्यक्ष पाणी मात्र या भागात आजुन पर्यंत आलेली नाही. जतला म्हैसाळचे पाणी द्या. अन्यथा कर्नाटक जाण्यास परवानगी द्या अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
जत हा कायमचा दुष्काळी भाग आहे. मान्सून पावसाने दडी दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जत तालुका दुष्काळी जाहीर करावा. जनावरांना चारा पाणी उपलब्ध करावा. चारा छावण्या सुरु कराव्यात.म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करावे . कर्नाटक येथील तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागाला उपलब्ध करून द्यावे. अन्यथा कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्यावी, या मागण्या करण्यात आल्या. दुपारी काही संतप्त आंदोलकानी संख तहसीलदार कार्यालयाचा फलक खाली उतरवल्याने काही काल तणाव निर्माण झाला होता.