: 11 नव्या चेहऱ्यांना स्थान
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत सत्ताधारी असणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तामिळनाडूत 39 जागा असून सर्व जागांवर प्रथम टप्प्यातच 19 एप्रिलला मतदान होणार आहे. द्रमुक हा विरोधकांच्या आघाडीचा भाग आहे.
या पक्षाने आपल्या निवडणूक वचनपत्राचीही घोषणा केली आहे. विरोधकांच्या आघाडीचे सरकार केंद्रात आल्यास नागरीकत्व कायदा रद्द केला जाईल. तामिळनाडूत हा कायदा लागू केला जाणार नाही. तसेच तामिळनाडूतील प्रत्येक महिलेला महिना 1 हजार रुपयांचे मानधन दिले जाईल, अशी काही आश्वासने या वचनपत्रात देण्यात आली आहेत. द्रमुकच्या मित्रपक्षांनी अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. द्रमुकने काँग्रेसला राज्यात 9 जागा देऊ केल्या आहेत. द्रमुकच्या मित्रपक्षांमध्ये काँग्रेससह दोन डावे पक्ष आणि इतर स्थानिक पक्ष आहेत.
द्रमुकच्या 21 उमेदवारांमध्ये 11 नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच 3 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण चेन्नई मतदारसंघातील विद्यमान खासदार तमिझाची थंगापांडियन यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याशिवाय दयानिधी मारन, एस. जगथरक्षकन, कलानिधी वीरास्वामी, काथिर आनंद आणि सी. एन. अण्णादुराई यांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.
अनुच्छेद 356 हटविणार
केंद्रात विरोधी पक्षांच्या आघाडीची सत्ता आल्यास राज्यपालांची नियुक्ती करताना राज्य सरकारचा सल्ला घेण्याचा नियम करण्यात येईल. तसेच राज्य सरकारे सत्तेवरुन हटविण्याचा केंद्राचा अधिकार काढून घेतला जाईल. यासाठी घटनेचा अनुच्छेद 356 रद्द केला जाईल, अशी आश्वासने द्रमुकच्या वचनपत्रात आहेत.
अद्रमुकचेही उमेदवार घोषित
द्रमुकपाठोपाठ अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षानेही आपल्या 16 उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारांची घोषणा पक्षाचे महासचिव एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनी केली. माजी खासदार जे. जयवर्धन आणि माजी आमदार डॉ. पी. सर्वानन यांना संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. जे. जयवर्धन (चेन्नई दक्षिण), रोयापुरम मनोहर (चेन्नई उत्तर), ई. राजशेखर (कांचीपुरम), ए. विजयन (अराकोनम), व्ही. जयप्रकाश (कृष्णगिरी), जी. व्ही. गजेंद्रन (अरनी), जे. भाग्यराज (विल्लूपुरम), पी. विघ्नेश (सालेम), एस. तामिळमानी (नमक्कल), अशोककुमार (इरोडे), के. थंगावेल (कारुर), एम. चंद्रहासन (चिदंबरम), पी. सर्वानन (मदुराई), व्ही. नारायणस्वामी (थेनी9, पी. जयपेरुमल (विरुधुनगर) आणि सुरचित शंकर (नागपट्टीनम) अशी उमेदवारांची आणि त्यांच्या मतदारसंघांची नावे आहेत. सर्व उमेदवार येत्या काही दिवसांमध्ये अर्ज सादर करणार आहेत.









