चीनच्या ‘बीआरआय’ला धक्का : ‘जी-20‘ परिषदेदरम्यान महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि युरोपियन युनियनने शनिवारी जी-20 शिखर परिषदेच्या बाजूला बहुराष्ट्रीय रेल्वे आणि बंदर प्रकल्पाची घोषणा केली. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा (बीआरआय) मुकाबला करण्याच्या उद्देशाने ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबत या मेगा पायाभूत सुविधा कराराची घोषणा केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट भारत, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील व्यापाराला चालना देणे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या जवळपास एक तृतीयांश भाग असलेल्या प्रदेशांना जोडण्यासाठी आधुनिक स्पाइस रूट स्थापित करणे हे आहे.
या भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि जागतिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी भागिदारी कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा सर्व देशांच्या दृष्टीने प्रोत्साहनात्मक ठरणार आहे. या कराराच्या माध्यमातून भारत, पश्चिम आशिया आणि युरोपमधील आर्थिक एकात्मतेचे प्रभावी माध्यम बनेल. यामुळे संपूर्ण जगाच्या कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासाला नवी दिशा मिळेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला. या योजनेत डेटा, रेल्वे, वीज आणि हायड्रोजन पाईपलाईन प्रकल्पांचा समावेश असून भारत आणि युरोपमधील व्यापार 40 टक्क्मयांपर्यंत वाढणार आहे. भारत या भागातील बंदरांशी शिपिंग लेनद्वारे जोडला जाईल. याव्यतिरिक्त, आखाती अरब राज्ये आणि भूमध्य समुद्र यांच्यातील भू-व्यापार मार्गांना गती देण्याच्या यूएस-समर्थित प्रस्तावावर देखील इस्रायल आणि आखाती देशांदरम्यान चर्चा झाली आहे.
हा खरोखरच मोठा करार : बायडेन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, हा एक मोठा करार आहे. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानायचे आहेत. ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हा जी-20 शिखर परिषदेचा केंद्रबिंदू असून या करारातून हा उद्देश साध्य होत आहे. शाश्वत विकास, पायाभूत सुविधा निर्माण करणे, दर्जेदार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आणि चांगले भविष्य निर्माण करणे असे अनेक हेतूही यातून साध्य होणार असल्याचे बायडेन यांनी नमूद केले.
‘आम्ही या बैठकीत आर्थिक प्रकल्पाबाबत घोषणा आणि उपक्रमांच्या एकत्रीकरणाची वाट पाहत आहोत. या महत्त्वपूर्ण आर्थिक कॉरिडॉरच्या स्थापनेसाठी ज्यांनी आमच्यासोबत काम केले त्यांचे मी आभार मानू इच्छितो, असे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान म्हणाले.
गेम चेंजर प्रकल्प
चीनच्या मोठ्या धोरणात्मक पायाभूत गुंतवणुकीला पर्याय देणारी ही योजना जागतिक व्यापारासाठी संभाव्य गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा आहे. प्रस्तावित सामंजस्य करारात अमेरिका, भारत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युरोपियन युनियन आणि इतर काही देशांचा समावेश आहे. सर्वप्रथम हा कॉरिडॉर ऊर्जा प्रवाह आणि डिजिटल संचार वाढवून संबंधित देशांमधील समृद्धी वाढवेल. तसेच कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्यात मदत करणार आहे.









