मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याला ‘एज्युकेशन हब’ बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने निर्णायक पावले उचलली असून आयटी खात्याने स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन हब तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
फोंडा तालुक्यातील शिरोडा आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी मंत्री सुभाष शिरोडकर, नितीन कुंकळ्ळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, नुकतेच मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले असून भविष्यात हे स्थळ सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला. याच तालुक्यात तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी स्थापन करण्यात आली असून तिचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले. यावेळी, शिक्षण क्षेत्रात सरकारने घेतलेल्या विविध उपक्रमांवरही मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.
देशातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण देण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने देशात प्रथमच कौशल्य विकास मंत्रालयाचीही निर्मिती करण्यात आली आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक राज्यांमध्ये ‘फिनिशिंग स्कूल संकल्पना’ सुरू झाली असून लवकरच गोव्यातही असेच स्कूल सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा सरकारने सर्व क्षेत्रात नाविन्यपूर्ण पावले उचलली असून अलीकडेच पर्यटन, स्टार्टअप, आयटी आणि उद्योग आदी चार नवीन धोरणे आणली आहेत. यापैकी कोणत्याही धोरणाबाबत कुणालाही आपल्या सूचना सादर करता येतील, असे ते म्हणाले.
मंत्री सुभाष शिरोडकर यांचे अभिनंदन
गोव्यात आयटी अभियांत्रिकी संस्था सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंत्री सुभाष शिरोडकर यांचे कौतुक केले. 2001 मध्ये गोव्यात केवळ 3 अभियांत्रिकी संस्था होत्या. परिणामी येथील विद्यार्थ्यांना अन्य राज्यात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. अशावेळी शिरोडकर यांनी गोव्यात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जगभरातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. अभियांत्रिकी क्षेत्रातून दरवषी 2 ते 3 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले पाहिजेत, असे आपले वैयक्तिक मत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.









